चि. अक्षय व चि. सौ पल्लवी
एक तपाचे साहचर्य ते,
कुसुमा सरसे मधुर असे,
प्रिती बहरली निशिदिनी
अन् आनंदाचे पर्व असे…………
सदा फुलावे मधुर फुलांनी,
परिमल त्याचा विहरत जावो,
गंधामधुनी सुरम्य ऐसे,
विश्व मनोहर पुलकित होवो…………….
दशोदिशांना लक्ष लक्ष त्या,
चैतन्याच्या ज्योती उजळो,
प्रकाश त्याचा तुमच्या जीवनी,
अहोरात्र तो उजळत राहो……………..
कधी न व्हावा तिमिर जीवनी,
चन्द्र तारका चमकत राहो,
दु:ख भय अन दारिद्र्याचे,
स्पर्श तुम्हाला कधी न होवो……………….
सदा फुलावा वसंत जीवनी,
सुख स्वप्नांची वर्षा व्हावी,
सदैव बहरत नित्य जीवनी,
रम्य सुरांची महफिल व्हावी………………….
इंद्रधनुचे रंग मिळावे,
ऐश्वर्याची सदा दिवाळी,
अविरत ऐसे सुख मिळावे,
प्रीत अशी ती बहरत जावी………………
कदा न यावे दु:ख जीवनी,
आनंदाचे मळे फुलावे,
भरल्या घरामध्ये सदाही,
समाधान ते सदा असावे…………………………..
जीवन तुमचे उमलत राहो,
आनंदकंद अभिराम असा,
अविरत देवो आनंदाचा,
गंधित रंगीत प्रकाश सदा………………………
प्रत्येक दिवसाने फुलत जावे
अविरत अमृत बरसत जावे
शब्दफुलांच्या माधुर्याने
जीवन संगीत काव्य बनावे………………………
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: २७-११-२०३
वेळ: सकाळी: ०७:२९