राहू देत मोकळेच
केस सखे आज तुझे,
नजरेस त्यात पाहू दे
रंग वेगळे असे………….
कुंतलात स्मित तुझे
नजर तुझी लाजरी,
शब्दमुक्त भाव तुझे
विहरू दे हृदयांतरी………
मूक शब्द होऊ दे
नजर शब्द होऊ दे,
न बोलताच शब्दही
सर्व मला उमजू दे………….
वायुलाही ना कळो
भाव तुझ्या मनातला,
भावगंध दरवळो
नजरेतुनी हृदयातला………..
शब्द वाक्य कांहीही
आता हवे कशास ते,
संयोग जाहला सखे
चित्तात गीत ते तुझे………….
एक ताल यमन राग
ख्याल हवा संथही,
शांतपणे फुलत असा
मृदुगंध धुंद मम मनी…………
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: २७-११-२०२३
वेळ: रात्री: २३:५०