डोक्यावरती पहाड मोठा
कोसळला तो समोर डोंगर,
जावे कुठे कांही कळेना
पाताळाचे महान संकट………
सूर्याचा प्रकाश हरवला
दीपावलीचे विझले दिवे,
मनामध्ये तरीही आमुच्या
आशेचे ते उंच मनोरे………..
केदाराच्या विष्णुरूपाला
वंदन करुनी क्षणात आम्ही,
महेशाच्या बद्रीविशाला
नतमस्तक ती आमची वाणी……..
अनंत जीवा दर्शन घडण्या
दर्शन चारी धामाचे,
मनुष्य यत्ने कार्य कराया
विश्वकार्म्याचे व्रत आमुचे …………
सद्कार्याला सदैव असते
आव्हानाचे कठीण संकट,
दैवी ऐसे कार्य कराया
विघ्नहर्ता तोच विनायक……..
विज्ञानाची विविध तंत्रे
यंत्रे सारी मागविली,
तिथे पोहचण्या जीवन मार्गा
निसर्ग स्पर्धा जगण्याची………..
दूर कुठून तंत्रविशारद
मार्ग काढण्या अवतरला,
वंदन करुनी स्थान देवता
रुजू जाहला कार्याला………..
अनंत योजिल्या युक्त्या सार्या
मार्ग तरीही गवसेना,
अतितटीची झुंझ चालली
वाचविण्या त्या जीवांना……….
जुन्याचा युक्त्या आणि क्लुप्त्या
मार्ग पुरातन अनुसरला,
मानव झाला ईशरूप तो
मुक्त तयांना करण्याला ……….
रवि मावळला सायंकाळी
अंधार पसरला चोहीकडे,
क्षणात मग तो मार्ग गवसला
प्रकाश पसरे चोहीकडे……….
स्मित झळकले बघुनी देवा
हास्याचा कल्लोळ तसा,
जीवात्म्यांच्या अंतरातुनी
ओंकाराचा जपमंत्र जसा………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोवा
दिनांक: २९-११-२०२३
वेळ: सायंकाळी: १७:१७