आज असा मी आरसा बघतां
दिसले मजला रूप नवे,
कधी न पाहिले यापूर्वी मी
ऐसे माझे रूप नवे…………
जुनाच आरसा दीप जुनाही
जागा तैसी बसण्याची,
तरीही मला मग रूप नवे ते
कैसे दिसले त्यामधुनी……….
प्रश्न विचारी मीच मला मग
काय जाहले नवे असे,
जुनेच सारे तसे असुनी
रूप नवे हे कसे दिसे………….
विचार करता सूक्ष्मपणे तो
दिसले माझे सौंदर्य मला,
मी जरी असले तीच जुनी परि
सौंदर्याच्या नव्या कल्पना………..
फेकून दिधल्या परिभाषा त्या
जनलोकांनी लिहिलेल्या,
मीच पाहिले मला फिरुनी
सौंदर्याच्या दिव्य खुणा………..
ओष्ठ लालही नाक सरळ ते
नयनी माझ्या तेज तसे,
कुंतल काळे महिरप माझी
सारे सुंदर माझे ते…………
वस्त्रे माझी मृदू तशी ती
कर्णकुंडले अन माला कंठी,
कटाक्ष माझा स्वयंपूर्ण तो
अंतरातला प्रकाश उजळी…………
आज उमगले स्वयं मला ते
सौंदर्याचे गुपित असे,
परिभाषा ती सौंदर्याची
स्वये लिहिता सौंदर्य दिसे………
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: १० डिसेंबर २०२३
वेळ: दुपारी १४:१७