तुझी नम्रतेची मोहिनी अजुनी
रमते मनासी अशी निशीदिनी,
मोहक आभा ती नयनात प्रीति
वेडावते मज ती आनन्दकारी…….
न भेटलो कधीही न स्पर्शले तनुस
परि श्वासात तुझ्या असे धुंद कैफ,
मनी रम्य किती सुकुमार रूपे
परि सर्व विरती तुझ्या रूपात..……
श्रुतींचे मनसोक्त ऐसे तराणे
आलाप घेता अन हरकतींचे,
उमले मनासी नवे काव्य तेंव्हा
जणु मध्यरात्री चंन्द्रकंस हसरा……..
स्मरता तुला तो वसंत येतो
मना भरभरुनी आनंद देतो,
अशी काय जादू तुझी नम्रतेची
अशी ओढ लावी कैसी मनाशी………..
नितांत सुंदर कशी प्रावरणे अन
ओष्ठी शलाका तशी रक्तीमेची,
बेभान वाटे मनी कल्पना त्या
बाहूत घ्यावे एका क्षणाला……
तुझा केशसम्भार आषाढ रात्री
रोखून पाहता मजला तसे तू,
रंगास्वरांचा वर्षाव होतो अन
विसरतो विश्वास अन आलिंगनी तू…….
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ३० मार्च २०२४