मनाच्या तळाशी,
असे डोह काळा,
तिथे वासनांचाच,
सारा पसारा………
अतृप्त ईच्छा,
अमूर्त वासनांचे,
पोळे तिथे ते,
असे दंश त्यांचे………..
भडकती ज्वाला,
तिथे काम अग्नि,
कधी शांत ना तो,
शमन होत नाही………
नियंत्रित त्याला,
करण्या सुयोग्य,
असे एक प्रौढ,
विच्चारी प्रबुद्ध…………..
तरी संघर्ष सारा,
असे चाललेला,
‘करण्या न करण्या’,
असे कृत्य व्हाया………
अस्तित्व तेथे,
असे नित्य सत्य,
तसे रोखण्याला,
मदान्ध चित्त………..
अहर्निश चाले,
संघर्ष सारा,
मना तृप्त करण्या,
सार्या क्रिया……….
परी ना तिथे तो,
अंकुश कांही,
सदा शोधतो तो,
विवेक कांही………
असे एक खचित,
खरा मार्ग आहे,
विवेके मना तू,
रोखून पाहे…………
कथिले सिंग्मंड
असे मानसशास्त्री,
परी अर्धसत्य,
कळले महोदयाशी………
भूतकाली भरतवर्षी,
रचिली षडदर्शने ती,
पतंजली महर्षी,
गुह्यातीगुह्य योगसूत्री…….
किती ज्ञानराशी,
अगम्य मना जाणण्याला,
अंकुश कैसा,
मना निरोधण्याला……….
नसे विश्व कुठे,
माया असे ती,
नसे सत्य कांही ,
मनी कल्पना ती…….
मनी ईश राहे,
असे तेच सत्य,
भजावे तयाला,
अहर्निश नित्य………
भजता तयाला,
उमगे आत्मरूप,
तसा सत्प्रकाश,
विचरे अंतरांत…………
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ३ मे २०२४
वेळ: सकाळ:०९:०९