Marathi My Poems

कठोपनिषद

परमात्मा-जीवात्मा, वसती हृदयी गुहेत,
आस्वाद घेती ते, परम सत्य फलाचे
विद्वान म्हणती तयाला, किती हे विचित्र
परी सत्य आहे, हे महत तत्व सारे…….

देहा नियंत्रित मन-बुद्धि करते,
असती छाया स्वरूप उभय अन्यत्व ते,
पशू धावतो तो, मणी मानवाच्या,
जयाच्या मनी नाच चाले कामनेचा……..

बहिर्मुख होती जे असे ते पुरुष,
ते भोगती ते शरीर दु:खे अनेक,
ग्रासे तयांना वेदना ती मनाची,
पराजित बुद्धि पावे तयांची……….

असे चिन्ह ते सर्व अहंकार त्याचा,
बने तो भिकारी लय अध्यात्मिकतेचा,
असे दिव्य-धर्म, ‘ऋतम्’ नाम ज्याचे,
सत्य वचनाहुनी श्रेष्ठ संयोग कर्मफलाचा……….

अस्तित्व नाही त्या अहंकाररूपा असे,
प्रकाशरूपा जीवात्मा न बांधिते जे,
‘असत्यं अहं ‘ रूप असे तो जीवात्मा,
‘सत्यं अहं’ असे रूप तो ची परम आत्मा………

उभय तो निवास हृदयी गुहेत
जीवात्म परमात्म प्रज्ञा असे उपस्थित तेथ……..
(१.३.१) नचिकेत नाम सार्थ असे अग्निरुपा,
निवास असे जेथ परम ब्रम्ह रूपा,
करती यज्ञ जे ते इच्छा मनासी,
भयशून्य होऊनी तरती संसार सागराशी………..(१.३.२)

जोडी किनारे अमर-स्वर्ग जगाचे,
विनाशी जगाच्या अशा मानवाचे,
असा जो पवित्र नचिकेत यज्ञ,
असे श्रेष्ठ काचित अमरमार्ग ऐसा………(१.३.२)

करिती यज्ञ जे ते पवित्र निष्ठे,
श्रद्धा मनी अन भक्तीभाव स्वरूपे,
नेई यज्ञ पुरुषा असा स्वर्ग लोका,
मिळे सर्व आनंद महत आत्मतत्वा………
कसे आत्मस्वरूप तसा आत्मयोग,
करुनी चिंतनाशी कथती ज्ञानी स्वरूप,(१.३.२)

रथ शरीराचा त्यात आत्मा आरूढ,
लगाम तो मनाचा, बुद्धि लगाम …….१.३.३

अश्व इन्द्रियांचे नेती विषयी पथाला,
उधळूनी चौखूर परी आत्मा बुद्धिमान….१.३.४

अनियंत्रित मनाला कसा रोखू पाहे,
अविवेकी असे अश्व इंद्रियांचे तसे….१.३.५

मना आवरुनी विवेकी जो चाले,
अश्व इंद्रियांचे सुचारू चाली ते पुढे….१.३.६

जया ना कळे काय यथार्थ आहे,
न आकळे तयाला अशुद्ध चित्त ज्याचे…१.३.७

असा विवेकहीन तो दुर्भाग्य त्याचे,
न पोहचू शकती ते परम त्या पदाशी…..१.३.७

प्रज्ञा जयाची आणि शुद्ध अंतरात्मा,
पोहचे पदाशी न पुनर्जन्म त्याला….१.३.८

विवेकी बुद्धी जयाची सारथ्य करते,
मनाने नियंत्रित परमपदी तो पोहचे….१.३.९

इन्द्रियाहुनि श्रेष्ठ वस्तू अनेक,
तयाहुनी श्रेष्ठ मन बुद्धि आत्मा…१.३.१०

महताहुनी श्रेष्ठ ते अव्यक्त आहे ,
अव्यक्ताहुनि ज्येष्ठ तो पुरुष आहे….१.३.११

पुरुषाहुनी श्रेष्ठ काहीच नाही,
असे ती सीमा जे सूक्ष्म तत्वाशी पाही….१.३.११
सर्व भूतमात्री असे अदृश्य आत्मा,
नसे दृश सर्वा परी सूक्ष्मबुद्धि दिसे तो महात्मा..१.३.१२

विद्वान त्यासी असे नाम श्रेष्ठ,
इंद्रिये जयाची लय तो मनात,
विलय तो मनाचा करे बुद्धि मध्ये,
प्रकाश स्वरूपी महत तत्व पावे…..
परी श्रेष्ठ ते त्यासी म्हणावे,
आत्म्यात ज्याच्या ‘महत’ तत्व विलये..१.३.१३

अविद्याग्रस्त पुरूषा, जागृत हो तू,
गुरु ज्येष्ठ शोधी आणि ज्ञान घे तू,
प्रवाही प्रवाह जणु तलवार तळपे,
असे लांघणे कठीण कथती ज्ञानीपुरुष..१.३.१४

पावती मुक्ती पुरुष ज्या हे समजले,
आत्मतत्व सरस सर्वाहुनी हे…….
अशब्द अस्पर्श अरूप अक्षय,
रसहीन, नित्य आणि गंधरहित……१.३.१५

जे ऐकती अन कथती अन्य लोका,
यमदेवे कथिले असे नाचिकेता
ते पावती अन गौरवान्वित होती,
पावती श्रेष्ठ गौरव ते ब्र्म्हलोकी…१.४.१६

ब्र्म्हवृन्दास वा पितृश्राद्ध काळी
शुचिर्भूत होऊनी कथे परमगुह्य,
असा भाग्यशाली असे तो पुरुष,
नि:संशय तयाला मिळे अमृत तत्व…१.३.१७
[प्रथम अध्याय – अमृतवल्ली]


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २४-०४-२०२४
वेळ: सकाळ: ०८:१५ ते ०९:४५

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top