पुन्हा एक प्रसन्न प्रभात
एक नवा सूर्य प्रकाश,
आयुष्यात रंग नवे
नवे पुन्हा ऋतु मनात….
स्थित्यंतरे दश वर्षी
पाहिली मी पदोपदी,
वेगळ्याच अनुभूति
हर्षोल्लीत आशा स्मृती..
कन्या मी जाहली जाया
नव्या नव्या जीवनी,
पट उघडत सारखे
गांधाळले मम मनी..
महद्भाग्य दिनी असे
मातृत्व लाभले मला,
परमोच्च हर्ष मानसी
आनंद ऐसा जाहला….
आज मी नव्यांकुरे
प्रफुल्ल रंग मनी असे,
भाव कुसुमे उमलली
रंग गंध नवे नवे….
आज जन्मदिन असा
नवा ऋतु नवी दिशा,
पुनश्च उष:काल हा
नव्या आशा उदित ह्या..
मनी बहरो मम मनी
पवित्र शुद्ध भाव ते,
लाभो मला आनंद पूर्ण
सुवर्ण दान पुनश्च ते..
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २७ जून २०२४
रात्री: २२:४६