शंकराचार्य हे सनातन हिंदू धर्मातील अतिशय मानाचे अत्युच्च श्रद्धास्थान आहे. आदि शंकराचार्यांनी, नास्तिक विचार प्रवाहांनी मृतवत झालेल्या सनातन हिंदू धर्माला पुनरुज्जीवित करण्याकरिता राष्ट्रव्यापी पदभ्रमण करून भारताच्या चार दिशांना चार मठांची स्थापना करून त्यावर शंकराचार्यांना दायित्व प्रदान केले. ते महान कार्य विदित करण्याकरिता हा लेख नाही, तर अशातच विनाकारण कांही गोष्टी स्पष्ट करण्याकरिता लिहीत आहे. ज्यांना त्याविषयी अधिक जाणून घ्यावयाचे असेल त्यांनी त्य विषयांवरील संशोधन निबंध वाचावा. (https://www.mukundbhalerao.com/wp-content/uploads/2022/05/An-Institutuion-Building-of-Cultural-India-by-Adi-Shankaracharya-A-Psycho-Social-Perspective.pdf )
प्राचीन काळापासुन हिंदू धर्मातील अत्युच्च शिक्षण व ज्ञान प्राप्त करण्याकरिता काशीच्या धर्मपंडितांसमोर धर्मचर्चा, शास्त्रसंवाद करावा लागत असे व त्यानंतर त्या व्यक्तीला ‘दशग्रंथी ब्राम्हण’ अशी उपाधी प्रदान करण्यात येत असे. हे दशग्रंथ म्हणजे,
०१) ऋग्वेद संहिता ( १ ते १० मंडलातील ९८५३ ऋचा मुखोद्गत कराव्या लागतात.)
०२) ब्राम्हणसंहीता: (प्रत्येक वेदाबरोबरच्या संहिता)
०३) आरण्यक
०४) शिक्षा
०५) कल्प
०६) व्याकरण
०७) निघंटु
०८) निरुक्त
०९) छंद
१०) ज्योतिषशास्त्र [खगोलशास्त्र (Astronomy), सिद्धांत ज्योतिष (Theoretical Astronomy). फलज्योतिष (Astrology), अंक ज्योतिष (Numerology)]
आता कल्पना करा की, जर दशग्रंथी ब्राम्हण होण्याकरिता वर नमूद केलेले ज्ञान मिळवावे लागते, तर शंकराचार्य होण्याकरीता कित्ती परिश्रम करावे लागत असतील.
श्रीमत्सुतसंहितेच्या यज्ञवैभवखंडाच्या दशमाध्यायात असे म्हटले आहे,
एकमेवाद्वितीयं स्यादित्याह श्रुतिरादरात् |
मायामात्रमिदं द्वैतमिति चाह पराश्रुति: ||
एकत्वं पश्यते मोह: क: शोक: इति चाह हि |
द्वितीयाद्वै भयं नाल्पे सुखमित्य पि चाह हि ||
अतस्तर्कं प्रमाणाभ्यां वस्त्वेकं सुनिश्चितम् |
वस्त्वेकं महा वाक्या देव जानान्ति ये द्विजा ||
ते मुच्यन्तीह संसाराद्यथा स्वप्नात्प्रबोधत: |
भेददर्शन मास्थाय मुक्तिवाच्छन्ति ये नरा : |
ते महाघोरसंसारे पतन्त्येव न संशय: ||
एक व अद्वितीय ब्रम्ह आहे असे श्रुति आदराने सांगते. तसेच दुसरी श्रुति ही सर्व द्वैत मायामात्र आहे सांगते. ‘आत्म्याचे सर्व शरीरात एकत्व पाहणाऱ्याला शोक व मोह कशाचा?’ असेही श्रुति म्हणते. भेदबुद्धी मुळेच संसाररूपी महाभयाची प्राप्ती होते. जे लोक भेददृष्टी ठेवून मुक्तीची ईच्छा करतात ते महाघोर संसारात पडतात, याविषयी काही संशय नाही. (शांकरभाष्यानुसार आचार्यभक्त विष्णु वामन बापट शास्त्रीकृत सुबोध ब्रम्हसूत्र, संपादक आचार्यभक्त पं. द. वा. जोग, उपनिषदतीर्थ, पृष्ठ: ४६२)
आदरणीय अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणशीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून ‘शास्त्री’ व ‘आचार्य’ पदव्या प्राप्त केल्या. इसवी सन २०२२ मध्ये त्यांना उतरखंड मधील जोशी मठाचे शंकराचार्य म्हणून दायित्व दिल्या गेले. त्यापूर्वी इसवी सन २००३ मध्ये १५ एप्रिलला त्यांनी ‘दंड संन्यास’ घेतला. त्यांच्याविषयी (म्हणजे शंकराचार्य या भूमिकेविषयी) माझ्या मनात वैयक्तिकरित्या खूप प्रचंड आदर आहे.) त्यांनी ‘शांकरभाष्य’ चा अभ्यास केला नसावा काय? नक्कीच त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असेल असे वाटते. मग त्यांना समजले नसेल का? छे छे, असे कसे होईल? नक्कीच कळले असेल. मग त्यांना उमजले नसेल काय? असे कसे होईल बरे! नक्कीच उमजले असणार. मग ते पटले नसावे काय? असे होऊच शकत नाही, कारण, आदि शंकराचार्यांच्यानीच तर ‘शांकरभाष्य’ लिहिलेले आहे. मग अशी परिस्थिति असतांना त्या परम आदरणीय अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना श्रीमान उद्धवजी ठाकरे व श्रीमान एकनाथजी शिंदे यांच्यात फरक कां वाटला असावा? त्यांना दोघांत एकच ब्रम्हरूप का दिसले नसावे? आणि असे ब्रम्हरूप सर्वांमध्ये ते का पाहू शकले नाही, पाहू शकत नसतील? जर का त्यांना असे ब्रम्हरूप सर्व प्राणीमात्रात दिसू शकत नसेल तर, मग हे सन्याशाचे बाह्यरूप कशाला व काय कामाचे? ती भगवी वस्त्रे कशाला? ते भस्म कशाला? ती शिखा कशाकरीता? तो संन्यास दंड काशाकरीता?
संन्यासी तर सर्वसंगपरित्याग केलेले असतात. आदि शंकराचार्यांनी ‘निर्वाणषटक’ यात काय म्हटलेले आहे,
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ,
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: |
न धर्मो न चाऱ्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरुप: शिवोsहम् शिवोsहम् ||३ ||
मला द्वेष नाही, मला राग नाही, मला लोभ नही आणि मला मोह सुद्धा नाही. मला ना अभिमान आहे, न ईर्ष्या आहे. मी धर्म, काम व मोकशाच्या पलीकडे गेलेलो आहे. मी शुद्ध चेतना हे, मी अनंत शिव आहे.
अहं निर्विकल्पो निराकार रपो,
विभूत्वाच सर्वत्र सर्वेद्रियाणाम् |
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेय:,
चिदानन्दरुप: शिवोsहम् शिवोsहम् ||६||
मी निर्विकल्प आहे, मी निराकार आहे. मी चैतन्य स्वरूपात सर्वत्र आहे. सगळी इंद्रिये मी च आहे. मला कशाचीच आसक्ती नाही, मी त्यापसून मुक्त आहे. मी शुद्ध चेतना आहे, मी अनादि आहे मी शिव आहे.
खरे तर, अप्रत्यक्षरीत्या आदि शंकराचार्यांनी पुढील सर्व शंकरांचाऱ्यांकरिता हा आदर्श वर्तनाचा दंडकच (Moral Code of Conduct) घालून दिलेला आहे. परंतु श्रीमान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांचे शब्द व अविर्भाव वरील आदर्शभूत दंडकांच्या विपरीत होते हे कुणीही सांगू शकेल.
देशात सनातन हिंदू धर्माच्या विरुद्ध आज जे जहरी वातावरण निर्माण केलेले आहे व करण्यात येत आहे, ते पाहता शंकरांचाऱ्यांसारख्या अत्युच्च पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे धर्मशास्त्राच्या कक्षेबाहेरील विषयाशी निगडीत विधान करून विनाकारण सममाजात चुकीचा संदेश दिलेला आहे. खरे तर हे लिहीत असतांना मला अत्यंत वाईट वाटत आहे. शंकरांचाऱ्यांच्या त्या सन्मानणीय पदाचा कुठलाही अवमान करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही व त्या पदाला कमी लेखण्याचाही उद्देश नाही. मला असे वाटते की, देशातील सनातन हिंदू धर्म विरोधी राजकीय पक्ष ह्या गोष्टीचे विनाकारण भांडवल करून धर्माला हानी पोहचवतील आणि म्हणूनच हे इतके विस्ताराने लिहिण्याचा प्रपंच.
| मुकुंद भालेराव | BA (Marathi Literature), MA (Sanskrit) |