शुभ्र चांदणे जणू, धवल पुष्प जाहले,
मनामनात स्नेहभाव, भरून पूर्ण जाहले |
अनंतकाल चाललो, सखे तुझ्या सवेच मी,
प्रेमभाव सुरमयी, माझिया तुझ्या मनी ||१ ||
स्वप्नपुष्प साजरे, पाहीले असे मनी,
सार्थसत्य जाहले, तुझे असे मम मनी |
भावरंग सप्तसुर, कुसुमात स्पर्श हासरे,
शांतगान शब्द जसे, कुसुम जणू लाजरे ||२||
सर्वभाव पाहिले, मनपुष्प जणू जाहले,
सूररंग सप्तभाव, मनामनात साहीले |
काव्यसंपदा जशी, उमलती शब्दफुले,
भावभाव उमलता, हसती सर्व भावफुले ||३||
पाहता मी मनात, रंगरंग स्मित ते,
मनस्पर्श भावपुष्प, भावनानिबद्ध ते |
नि:शब्द भाव मानसी, उमगते सर्वही,
सांगण्याशिवायही, मी ऐकतो सर्वही |४||
एक एक भावही, एक एक स्वर असा,
संगीतात मुग्ध जणू, धुंदराग ही जसा |
शब्दही नको अता, भावशब्द उमलती,
सप्तसूर जे सदा, नयनात ते विहरती ||५||
स्वरात शब्द मिसळूनी, शब्दसुर जाहले,
भावरंग कुसम ते, भावचित्र जाहले |
शब्द ते नको आता, रंग चिंब जाहले,
कुंचल्याविनाच चित्र, काव्यपुष्प जाहले ||६||
|| मुकुंद भालेराव ||
| औरंगाबाद | १०-१०-२०२० |
Back To Top