Marathi

देव समरसतेत पाहून घे

बाहेर जरी दिसते असे, तत्व मात्र एकच आहे,
तुझ्यामध्ये मी आहे, नी माझ्यामध्ये तु आहे……||१||

आदि आहे शक्ति जरी, शिव तिचे रूप आहे,
अर्धनारीनटेश्वर, म्हणून तर तसे रूप आहे….||२||

संयोग आपला होत असतो, हे काही खरे नाही,
आधीच सगळे ठरले असते, आपल्याला ते कळत नाही….||३||

त्याच्यापसून त्याच्यापर्यंत, एक वलय एक प्रवास,
सगळेच ह्याच मार्गाने, जात असतात विनासायास….||४||

पाहतो आपण सर्वाना, हे मात्र खरे नाही,
कारण जे दिसते जसे, ते काही खरे रूप नाही….||५||

मृततिकेच्या प्रतिमा साऱ्या, खरे तर मातीच असते,
मी माझा नी तू तुझा, सत्य मात्र वेगळे असते….||६||

आदि नाही अंत नाही, फक्त एक प्रवास आहे,
जाणिवेच्या तत्वांचा, हा फक्त एक आभास आहे….||७||

युगांपासून सारे सारे, शोधाचा मार्ग शोधत आहेत,
सापडले म्हणतात तितक्यात, भरकटलो हे कळत आहे.. ||८||

योगी आणि ऋषिमुनि, घोर तप करून झाले,
मंत्रतंत्र करून सारे, यज्ञही करून झाले..||९||

अन् मग अचानक एक दिवस, देव समोर उभा झाला,
‘काय शोधतो आहेस रे, प्रश्न विचारून शांत झाला..||१०||

काय शोधत होतो मी, हेच मुळात विसरून गेलो,
त्यालाच तर शोधत होतो, असे काही बोलून गेलो… .||११||

अरे वा ! कित्ती सोपे, देव तर इथेच आहे,
मंत्र नाही तंत्र नाही, अगदी कित्ती सोपे आहे… .||१३||

कशाला उगाच करायचा, इतका मोठा आटापिटा..
देव तर आता सहजपणे, आपल्या जवळ इतका मोठा…..||१४||

वेदांमध्ये वेगळे काय, लिहिले मात्र माहीत नाही,
कधी ते शिकलो नाही, कारण मात्र माहीत नाही..||१५||

देवानेच कदाचित असे, ठरविले असेल त्याच्या मनात,
पाहू तर खरे हा, कसा शोधतो मला जगात..||१६||

देवाला तर काही शक्य, केव्हाच मला भेटला असता,
विनासायास दर्शन देऊन, सांगून केव्हाच गेला असता..||१७||

पण त्याने तसे केले नाही, परिक्षा पहात असेल का,
करतो मी प्रयत्न किती, हे तर पहात नसेल का..||१८||

खर तर मी किती क्षुल्लक, परीक्षा काय पहायची,
येणार मला नव्हतेच काही, कशाला वाट पहायची..||१९||

देव म्हणाला शांत हो, शोध सारा सोडून दे,
सेवा खरा एकच मार्ग, देव समरसतेत पाहून घे…. ||२०||

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top