Marathi

रंगात रंगलेले किती रंग हे निराळे….

ना पाहीले कधी मी उन्मुक्त चित्त ऐसे,
मन भावले सहजही हे चित्र मुक्त ऐसे….

कधी रंग हे बहरले कळले मला न काही,
स्वप्नात पाहीले जे दिसते इथेच काही…
मनी साठवू किती हे स्वर्गीय रंग ऐसे,
रंगात रंगलेले किती रंग हे निराळे….

शब्दात सांगू कैसे मनरंग हे निराळे,
चित्रात साठवेना हे शब्दची निराळे….
किती गूढ भावनांचे गहरेच रंग सारे,
किती सांगती निराळे स्वप्नील भाव ऐसे….

स्वप्नी मनात माझ्या चित्रेच ती निराळी,
सांगू आता कसे मी होतीच ती निराळी..
जो शब्द मी दिलेला पक्का मनात आहे,
शब्दास जागणारा मी मुक्त एक आहे….

जे पाहीले न तू ही शब्दात मांडतो मी,
हळव्या मनास माझ्या ऐसेच सांगतो मी….
कित्येक शब्द माझे केव्हाच रिक्त झाले,
अर्थास अर्थ आता नुरला न काही नाही….

अर्थास शब्द आता नुरलेच काही नाही,
का शोधू मी उगाच शब्दास अर्थ नाही….
गेली निघून वेळ शब्दात सांगण्याची,
समजून का न घेशी माझी ही प्रीत ऐसी….

हिंदोळ भावनांचे आहेत मुक्त अजुनी,
ते सांगतो प्रिये मी आहेच वेळ अजुनी..
इतकेच सांगतो मी मी ही तसाच आहे,
तू पाहिला मला जो तैसाच अजून आहे….

दिसते तसेच नसते परी सत्य ते निराळे,
मननेत्र पाहती जे असतेच ते निराळे….
ह्या भावना उमलल्या सुमने फुलूनी आली,
हृदयात साठले जे नयनात तेच पाणी….

रोखू नकोस आता ते बंध भावनांचे,
हलकेच ते फुलू दे ते बंध रेशमाचे…
कळले तुलाच सारे शब्दा विनाच आता,
का मी उगाच पाहू शब्दास बांधण्याला….

कळले तुझ्या मनाला सारे मनातले हे,
स्वररंग पाहिले मी नयनात रंगलेले….
नुरले न शब्द आता काहीच सांगण्याला,
ना राहिले आता तर काहीच चांगण्याला….

होते किती तराणे छंदात गायलेले,
रंगात ही स्वरांचे सारे तुझे बहाणे….
छंदात थिरकणारे सारेच शब्द होते,
तालात नर्तनाच्या हसणे तुझेच होते….

भावात रंगलेले किती मुक्त शब्द गावे,
आळवून त्या स्वराना स्वप्नातही असावे….
फिरूनी पहाट व्हावी उषासवे द्वयांची,
आभास तारकांचे आपुल्या मनास व्हावे….

उत्फुल्ल चांदण्यांचे स्वर्गीय नृत्य व्हावे,
हसण्या प्रपात बघण्या जवळीच तू रहावे….
वृक्षास बिलगणाऱ्य वेलीस किरणांची,
असतेच साथ जैसी तैसी तुझी रहावी….

हसती नभात त्याही त्या चांदण्या जलात,
उधळून सुमनांची जणू चालली वरात….
शिर्षस्थ पर्वतांच्या फुलल्या अपूर्व बागा,
सरीतेत वाहणाऱ्या दिसती अपूर्व साऱ्या….

नभमंडपी फुलोरे दिव्यत्व दैवतांचे,
अंतस्थ आपल्या ते आनंदसूक्त त्यांचे….
पूर्वे रवी उमलता नभ व्यापले मनाचे,
मनरंग रक्तिमेचे स्वर्गीय कांचनाचे….

कैलासही प्रगटले आता इथे मनात,
सस्मित ते हरीचे सान्निध्य अंतरात….
शैवास भेटण्याला आतूर शक्ति झाली
तैसी मनात शिरूनी हृदयस्थ तूच झाली….

| मुकुंद भालेराव | १४-०३-२०२१ | /p>

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top