पूर्वेस रक्तिमेचा, चेहरा उदीत झाला,
सार्या दिशात विहरत, अवचित गंध आला……
ऐसे प्रफुल्ल सगळे, ते सामगान झाले,
त्या मुक्त पाखरांचे, आकार चित्र झाले……..
पाने चमकती ती, त्या सानुल्या दवानी,
वृक्षावरी विहरती, रंगीत पूष्प राशी……….
जाता समोरे थोडे, तो पंथ संथ दिसला,
स्वच्छंद सूर्यराशी, त्या निर्झरात दिसल्या……
आता कुठे निघालो, ऐसा विचार आला,
नसता दिशा मनाला, उत्साह तो निमाला…….
दिशा मनात नव्हती, नव्हते ठिकाण काही,
नगरात कोणत्याही, ना जायचे मला ही…..
त्या निबीड भयाण राती, कसलेच भान नव्हते,
ऐशा कभीन्न राती, कसलेच कार्य नव्हते……
का चाललो कशाला, माझे मला न कळले,
तरी एकटा निघालो, इतकेच फक्त कळले……..
अंधार दाट होता, नव्हती कुठे शलाका,
आकाश चांदण्यांचा, मजला आधार होता……..
मी पाहुनी सभोती, वृक्षात चांदण्याना,
शोधीत चाललो तो, कुसुमास पाहताना……..
तो शोध तो कशाचा, माझे मला न कळले,
अस्वस्थ चित्त माझे, माझे मला न कळले……..
तो दिव्य कल्पवृक्ष, तो वृक्षपुरुष दिसला,
वाटे कुणी तपस्वी, ब्रम्हात लीन झाला………
वृक्षात चेतनेची, ऐसी कशी प्रतिती,
ना पाहिली कधीही, पुरुषात ही कधीही………
रमलेच चित्त तेथे, शोधीत मम मनाला,
विसरून स्वत्व माझे, मी पाहिले नभाला…….
अवकाश सप्त भूवनी, तैसे दशोदिशांना,
शोधून सर्व झाले, ना शोधिले मनाला……..
कैसा तिथे भटकलो, गिरीकंदरी वनी मी,
माझे मला न उमगे, का न शोधले मनी मी…….
काही न गवसले मज, शोधीत राहिलो मी,
वृथा प्रवास सारा, तरी रिक्त राहिलो मी………
माझ्या मनांत तेंव्हा, किती दाटले विकल्प,
हे सत्य वा निराळे, शोधी अनंत कल्प………….
नव्हते कुठेच काही, मन शांत चित्त व्हाया,
नुसता निरर्थ सारा, तो मायेचा पसारा…………
त्या शांत निर्झरात, आकाश शांत चित्त,
मी विसरलो मलाही, मन जाहले अनंत……..
|| मुकुंद: भालेराव: ||
| औरंगाबाद | महाराष्ट्र | डिसेंबर ३०, २०२१ |