
वाकलेल्या पल्लवीला पावसाने चुंबिले,
अतृप्त काळ्या मातीला पावसाने सुखविले,
दूर तिकडे पलीकडे गिरीकंदरा सुखवसा,
हरित उत्फुल्ल वृक्षातूनी मुक्तबिन्दु स्वर जसा……….
प्रसन्न शुभ्र जलप्रपाती तुषार मुक्त नर्तती,
भेटण्यास जिवलगाशी प्रेमयुक्त विहरती,
इवल्याच त्या पर्णांकुरी स्नेह सारा दाटला,
आकंठ स्नेह हर्षासवे मैत्र सारा दाटला………
मनभावलेला वाकलेला वनमित्र हिरवा डोलतो,
वायुसवे आपुल्याच अंगा प्रेमरूपे साहतो,
शिर्षस्थ त्याच्या गुलाबी अवकाश ते पसरले,
प्रीती गुलाब वर्षताही मनी स्नेहपुष्प उमलले………..
त्या तिथे हरीत दिसतो सूर्य प्रकाशाचा कवडसा,
बोलतो लडिवाळ शब्दे फुलवितो प्रेमाचा मळा,
ह्या इथे अन् त्या तिथे शालूच हिरवा दिसतसे,
लेउनी साज हिरवा धरतीच आई भासते…………
हरवुनि मी मोहूनी मी विसरलो केंव्हाच मी,
शोधतो मी विश्वरूपा अदृश्य परमेशास मी,
कोण म्हणतो रूप नाही अव्यक्त असतो देव ही,
सृष्टीच्या या दिव्य रुपे दिसतसे अव्यक्त ही………..
मुकुंद भालेराव
औरंगाबाद | १२ मे २०२२ | सकाळी: ०९:१३ |