Marathi

जंबुद्वीप मित्र असा अस्त पावला

पूर्वेच्या सूर्याला ग्रासिले कुणी,

हसणार्‍या बुद्धाला मारीले कुणी……..

शांतीचे धवल स्मित मंदसे तिथे,

प्रीतीचे रम्यबंध उमलले तिथे………

सागरात उभवले राज्य रवीचे,

पूर्वेला अर्धोन्मिलित स्वप्न मनीचे……..

दशक चार सुंदरसे फूल उमलले,

हसणार्‍या सूर्याला जणू बुद्ध उमगले……..

शांतीचा पुत्र असा तिथे नांदला,

विश्वाने शांतीचा नवमंत्र पाहिला…….

माध्यान्ही जनमनी संवाद साधता,

कोसळला हिंदमित्र असा पाहता……..

जंबुद्वीप मित्र असा अस्त पावला,

माध्यान्ही क्लांत मनी अर्घ्य वाहिला……

मुकुंद भालेराव

औरंगाबाद

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top