
सुवर्णगिरीच्या माथ्यावरती,
अंतरीक्ष हे निळे निळे,
वसती सन्निध सुंदर ग्रामे,
सरितांचेही रूप फुले………….
धवलगिरीच्या शुभ्र रूपाने,
चित्तामध्ये हर्ष वसे,
हरित वृक्षही असे प्रफुल्लित,
कनोकणी जणू स्वप्न दिसे…………
सात्विकतेचे असे फुलोरे,
आनंदाच्या वेदऋचा,
अंतरातील गङ्गौघाने,
पवित्र सार्याौ दिव्य ऋचा……….
नऊ रसांच्या सप्तसुरांचे,
नभांगणातील काव्य नवे,
सौंदर्याचा मनोज्ञ लहरी,
परमेशाचे रूप दिसे………..
मंत्र नको अन तंत्र नको,
हवे कशाला यज्ञ तसे,
निसर्ग रूपे तिथे प्रगटते,
अव्यक्ताचे रूप दिसे………….
विश्वामधल्या दिव्यशक्तींचा ,
तिथे निरंतर वास असे,
अंतरातल्या ईशतत्वाचा,
क्षणोक्षणी तो भास असे…………
विचार वलयी गुंतून पडता,
सत्याचे मग स्मरण नसे,
श्रद्धाभक्ति प्रफुल्ल चित्ती,
सत्वाचे निजरूप दिसे…………
पंचभूतांचे स्वरूप सुंदर,
ईशतत्वाची ओढ असे,
अंतरातल्या विश्वामध्ये,
ईशतत्वाचा ध्यास असे…………..
द्वैताद्वैती संमोहीत मन,
सत्य रुपाचे भान नसे,
शोधीत राहे विश्वामध्ये,
प्रतिकांमध्ये ईश नसे……………
मुकुंद भालेराव | संभाजीनगर १७-०९-२०२२ / सकाळी: ११:३९