कांही दिवसांपूर्वी डा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात विद्यार्थ्यानी कांही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. त्यांत एका समूहाने कुठल्याशा सादरीकरणात सीतेच्या तोंडी लावणी टाकून नाट्यप्रतिभेचा, हिंदुसंस्कृतीचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केला. खरे तर भारतीय दंडविधानाप्रमाणे दाखलपात्र गुन्हा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन हस्तक्षेप केला व ते प्रस्तुतीकरण बंद पाडले. ते चांगलेच झाले. नंतर मा. कुलगुरूंनी त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर ‘चला हवा येऊ द्या’ ह्या मालिकेतील एक विनोदी नट श्री. भारत गणेशपुरे यांनी एक विवादास्पद व अज्ञानमूलक असे विधान केले, जणू काही ते साहित्याचार्यच आहेत. मला कल्पना नाही की, त्यांनी नाट्यशास्त्रात शिक्षण वगैरे घेतले आहे किंवा नाही, परंतु त्यांनी तसा खोटा आव आणून वक्तव्य मात्र केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की ‘प्रहसन’ हा नाट्य प्रकारच मुळी विडंबनात्मक असतो. त्यामुळे, त्या महोत्सवात सीतेने लावणी म्हणणे चूक असू शकत नाही. श्री. भरतपुरेंना बहुधा बॉलीवूडची बाधा झालेली असावी; कारण महादेवाला दूध वहिल्याने ते वाया जाते, दिवाळीत फटाके फोडल्याने वातावरण दूषित होते असे अकेलेचे तारे बॉलिवूडमधील कलाकार सतत तोडत असतात. असो.
आपण आता नाट्यशास्त्राचे जनक व निर्माते महर्षि भरतमुनींनी त्यांच्या ‘दशरूपक ‘ ह्या नाट्यशात्रावरील ग्रंथातील ‘प्रहसन’ ह्या प्रकाराविषयी काय लिहिले आहे ते पाहूया. तत्पूर्वी, मला आठवलेले एक वाक्य येथे नमूद करू इच्छितो. हे वाक्य पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील रंगमंचाच्या अगदी वर लिहिलेले आहे. ते वाक्य असे आहे की,
“नाट्यंभिन्नरुचिरजनस्य बहुध एक्यं समाराधनं |”
अर्थात, वेगवेगळ्या रुचि असणार्या लोकांचे एकाच वेळी समाधान करते ते नाटक. खरे तर ह्या एकाच वाक्यात नाटकाच्या अनेक अंगभूत गुणांचे वर्णन केलेले आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश देणे हे कार्य देखील व्हावयास पाहिजे. श्री. भरतपुरे म्हणतात त्याप्रमाणे प्रहसन हा विडंबनात्मक नाटयप्रकार आहे हे एका क्षणापुरते मान्य जरी केले तरी, त्यातून देवीदेवतांचा किंवा महापुरूषांचा अवमान होऊ नये हे नक्कीच.
आता ह्या पार्श्वभूमीवर, आपण भरतमुनिंच्या ‘दशरूपका’ कडे वळूया. दशरूपकातील हा श्लोक पहा.
“पितापुत्रस्नुषादृश्यं यस्मातू नाटकम् | तस्मादेतानि सर्वांनी वर्जनीयानि यलत: ||२२.२९९ |
यांतील ‘एतानि’ या शब्दात चुंबन, आलिंगन इत्यादि असा गर्भितार्थ आहे. ‘वरणं’ म्हणजे वर्जन, परिहार. हा दंडक लक्षात घेतला तर लावणीतील अङ्गिक व वाचिक अभिनय हा सीतामाईच्या रूपात दाखविणे कोणत्या सभ्य समाजात स्विकार्य असू शकेल? ही अभिरुची हीन दर्जाची म्हटली पाहिजे. भरातमुनिंनी ‘प्रहसन’ ह्या दशरूपकातील प्रकाराबाबत खालील श्लोक लिहिलेले आहेत.
प्रहसनमपि विज्ञेयं शुद्धं तथाच संकीर्णम् ||९३||
भगवत्तापसविप्रैरपि हास्यवादसंबद्धम् |
कापुरुषसंप्रयुक्तं परिहासाभाषणप्रायम् ||९४||
अविकृतभाषाचारं विशेषभावोपपन्नचरित पदम् |
नियतगतिवस्तुविषयं शुद्धं ज्ञेयं प्रहसनं तु ||९५||
साधु, तपस्वी, ब्राम्हण तसेच इतर ही मनुष्यांच्या हास्यास्पद वादाशी संबद्ध, हीन पुरुषांनी योजलेले, मुख्यत: परिहासरूप संवाद असलेले, भाषा व आचार विकृत नसलेले, विशेष भावांनी संपन्न असे चरित असलेले आणि ज्यातील कथानकाची गती ठरलेली असते ते प्रहसन शुद्ध होय असे समजावे. थोडक्यात काय तर प्रहसन हे हास्यरस प्रधान असले तरी त्यातून हीन अभिरुची मात्र प्रदर्शित होणे अपेक्षित नाही. प्रहसन म्हणजे काही तमाशाच्या फडात सादर करण्याची होनाजी बाळाची शृंगारीक लावणी किंवा वग नाही; तर सुसंस्कृत समजाने आपल्या आप्तस्वकीयांबरोबर एकत्र बसून अनुभवण्याचा उच्च अभिरुचीचा नाट्ट्यप्रकार आहे. हास्यरस निर्मितीकरिता विडंबन करणे गरजेचे असू शकेल, पण त्याचा अर्थ आर्ष महाकाव्यातील आदर्शभूत व्यक्तींना रूचीहीन प्रकारे सादर करणे असा मुळीच नाही.
मला वाटते, श्री. भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या व्यस्ततेमधून जरासे बाजुला होऊन नाट्ट्यशास्त्राचा अभ्यास करावा; व हवे तर श्री. विक्रम गोखले, डा. मोहन आगाशे किंवा डा जब्बार पटेल यांच्यासारख्या अनुभवसिद्ध व्यक्तींकडून थोडेसे काही शिकून घ्यावे.
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजीनगर / २५-१०-२०२२