मला माहीत नाही हे गद्य आहे, पद्य आहे की, निबंध आहे. मुक्तचिंतन आहे मुक्तविचार आहे की मुक्तछंद. यातील छंद कोणता आहे, रस कोणता आहे व वृत्त कुठले आहे की, सर्वांची सरमिसळ आहे. हे तत्वज्ञान आहे की, सामान्य ज्ञान आहे. हा खोलवर केलेला गहन विचार आहे की, सहज सुचलेला मुक्तसंवाद आहे. हे स्वगत आहे की, संवाद आहे. हे जाणीवेतून लिहीले की आजाणता. विचारपूर्वक लिहिले की, भावनेच्या भरात जे कांही मनांत आले ते भराभर लिहीत गेलो, परंतु हे सर्व लिहीत असतांना एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की, अंतस्थ हेतु हा उत्कृष्ट साहित्यिक मूल्य असणारे यातून निष्पन्न व्हावे असाच होता. मम्मटाने त्यांच्या ‘काव्यप्रकाश’ ह्या ग्रंथात पाहिल्याच उल्हासात असे म्हटले आहे,
तददोषौ शब्दार्थौ सगुणावनलंकृती पुन: क्वापि |
इदमुत्तममतिशायिनि व्यङ्गे वाच्याद ध्वनिर्बुधै: कथित: |
[काव्यप्रकाश: उल्हास-१, कारिका-४]
काव्य म्हणजे दोषरहित, गुणमंडीत आणि क्वचित अनलंकृत असे शब्द आणि अर्थ होत. वाच्य अर्थापोटी व्यंग अर्थ हा ज्यात अधिक चमत्कृतिजनक (रंजक) असतो ते काव्य उत्तम होय. पंडीतांनी त्याला ‘ध्वनि’ ही संज्ञा दिलेली आहे.
मूलाधार हा वर वर्णन केल्याप्रमाणे असला तरी, व्यक्त होतांना जास्तीत जास्त मुक्तछंदाचा (Free Verse) चा उपयोग केला आहे; कारण पारंपारिक छंदबद्ध रचनेमध्ये केंव्हा केंव्हा अभिव्यक्ती काहीशा बंधनात अडकते. मुक्तछंद हा आधुनिक काव्यरचनेचा प्रकार असून फ्रेंच काव्यक्षेत्रात १८८० च्या दशकांत ‘व्हर्स किब्रे’ अशी एक चळवळ उदयास आली. ग्युस्ताव्ह कान, लाफोर्ग, र्याम्बो हे प्रतीकवादी कवी या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. कवितेला पारंपरिक छंदोरचनेच्या बंधनातून मुक्त करून बोलभाषेच्या स्वाभाविक लयीला कवितेत प्राधान्य देण्याचा प्रयत्न या चळवळीतील कवींनी केला. या चळवळीने प्रभावित झालेल्या टी. एस. एलियट, एझरा पाउंड, टी. ई. ह्युम, एफ. एस. प्लीन्ट, रिचर्ड ओलिंग्टन इत्यादि कवींनी इंग्रजी काव्यात ‘फ्री व्हर्स’ ची कल्पना विसाव्या शतकाच्या प्रारंभी रूढ केली. ह्या प्रकारात प्रसिद्ध कोलरीजचे ‘ख्रिस्ताबेल’ (१८१६), वोल्ट व्हिटमनचे ‘लीव्हज ऑफ द ग्रास’ (१८५५) हे काव्य ध्वन्यानुसारी आरोहावरोहात्मक आंदोलनाचा वापर करून लिहिलेले आहे.
मुक्तछंद हा काव्यनिर्मितीच्या आंतरिक गरजेतून निर्माण झालेला एक नवा छंद म्हणता येईल. पूर्वीची छ्ंदोबद्ध कविता गेय व श्रवणीय होती. (उदाहरणार्थ: बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.), तर मुक्तछंद हा डोळ्यांना व मनाला आवाहन करणार्या ध्वन्यानुसारी व उच्चारानुसारी (Rhythmic & Pronunciation based.) रचना प्रकार आहे. मुक्तछंद विशिष्ट धाटणीने वाचल्यास त्यातील लय-तालाचा प्रत्यय येतो. अनियमितता पण गतीमानता व सतत परिवर्तनशील अशी तालबद्धता (Rhythm), तोल (Balance), शब्दरचनेतील ध्वन्यानुसारी आरोहावरोह व आंदोलने (Cadence) व लय (Tempo) ही साधारणपणे मुक्तछंदात्मक पद्यरचनेची मूलतत्वे मानली जातात. निर्बंधातून मुक्त झालेला छंद तो मुक्तछंद असे म्हणता येईल. मुक्तछंद सयमक व निर्यमक असा दोन्ही प्रकारचा असू शकतो. पाश्चात्य मुक्तपद्य साघात, आरोहावरोही लयतत्वावर आधारलेले आहे. मराठीत येतांना मुक्तपद्याने मराठीला सहज अशा विलंबित छान्दस उच्चारणाची ढब स्वीकारली. पु. शि. रेगे यांनी ‘सहज काव्य’ या नावाचा मात्रिक आवर्तताची छटा असलेला ‘म्हणणी’ योग्य छंद वापरात आणला. पण पुढे त्यांनी छान्दस मुक्तछंदास स्वीकारले.
गद्यपद्याच्या सीमेवर येईल अशी मुक्तशैली आणि कसलीही चाल न लावता, केवळ विराम चिन्हाच्या आधारे सरळ गद्यसदृश वाचता येईल असा मुक्त रचना प्रकार वा. ना. देशपांडे यांनी आणले. याबरोबरच गद्यगीतासारखे प्रयोगही होत राहीले. जुन्या पादाकुलकी मात्रावर्तनी रचनेचा प्रयोग मर्ढेकरांच्या काव्यात दिसतो.
भंगु दे काठिन्य माझे, आम्ल जाउ दे मनींचे,
येऊ दे वाणीत माझ्या, सुर तुझ्या आवडीचे……
तसेच ,
सर्वे जंतु रुटीना | सर्वे जंतु निराशया: ||
सर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दु:ख लौग भरेत् ||
आणि
माझा अभंग माझी ओवी | नतद्रष्ट गाथा गोवी,
इंजिनाविण गाडी जेंवी | घरंगळे ||
कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ| कुठे तुकाराम पवित्र |
कुठे समर्थ धिरोदात्त | संत सर्व ||
संत शब्दांचे नाईक | संत अर्थांचे धुरंधर,
एक श्ब्दांचा किंकर | डफ्फर मी ||
[आणखी कांही कविता – मर्ढेकरांच्या कविता – १९५९/१९९४ , मौज प्रकाशन गृह ]
बोलीतील आणि वक्तृत्वशैलीतील सहज लयीची विविध रुपे प्रगट करणारे विंदा करंदीकरांचे प्रयोग महत्वपूर्ण आहेत. र. कृ.जोशींच्या कवितेतून दृश्य ध्वनिगुणांचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. आजच्या पद्यरचनेत ज्याप्रमाणे सांगीतिक, श्रवणसुभग असा केवळ श्राव्य लयीऐवजी आघात-आंदोलनात्मक रचनेवर भर देण्याची प्रवृत्ती दिसून येत असली तरी, ही रचना तत्वे परमार्थाने लय तत्वाशीच निगडीत आहेत. [संदर्भ: मराठी विश्वकोश – मुक्तछंद – भाषा आणि साहित्य – साहित्य – साहित्य प्रकार – मुक्तछंद]
असो, तर हे जे कथाबीज कुणी माझ्या कानांत सांगत होते की, आतून ऐकू येत होते मला नाही सांगता येणार. हे माझ्या स्मरणातून स्त्रवले की, कुठून तरी बरसत आले, आपोआप.
माझा असा दावा मुळीच नाही की हे ‘माझेच’ आहे; कारण ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं |’ विश्वात प्रत्त्येकच वेळी कुणी एखादी गोष्ट शोधून काढतो असे नव्हे. याबाबत मला कांही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार यांची प्रगट मुलाखत आठवते. त्यावेळी, ‘कजरा रे कजरा रे तेरे काले काले नैना’ हे गाणे फारच गाजत होते. तरुण पिढी तर पार वेडी झाली होती, त्या गाण्याच्या संगीताने. श्री. इनामदार यांनी संवादिनी घेऊन श्री. सुधांशु यांनी लिहिलेले व पूर्वी दर गुरुवारी न चुकता आकाशवाणीवर सकाळी हमखास ऐकू येणारे श्री. आऱ. एन. पराडकर यांच्या आवाजातील सुमधुर भक्तीगीत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ ऐकविले, व त्यानंतर संवादिनीच्या त्याच पट्यांमधून ‘कजरा रे कजरा रे’ हे गीत ऐकून दाखविले. फक्त शब्द बदललेले होते व तबला व संवादीनीशिवाय अनेक नवीन इलेक्ट्रानिक वाद्ये वापरली होती. पण मुळात संगीताचे स्वर तेच होते. जगात कुठेही तेच सात स्वर संगीतात असतात, फार तर ते लिहिण्याची लिपि वेगवेगळी असेल. असो.
मुद्दा असा आहे की, मग मी असे कसे म्हणू शकतो की मी जे खाली लिहिले आहे त्याची मूळ रचना मीच केली. जसे महापुरुष कुणा एकाचे, एका कुटुंबाचे वा समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचेच फक्त असू शकत नाही; अगदी तसेच ज्ञान हे खरे तर कुणाची वैयक्तिक संपत्ति असू शकत नाही, सदासर्वदा ! अगदी आत्ताच्या वैयक्तिक बौद्धिक संपदा कायद्याप्रमाणे देखील कांही काळानंतर ते सर्वांचे होऊन जाते. आजच्या जगातील मानसशास्त्रज्ञ देखील आस एम्हणात आहे की, समाज्त मिळून मिसळून राहणार्या व्यक्ति ताणतणाव, अवास्तव चिंता यापसून दूर राहू शकतात आणि खास करून वरिष्ठ नागरिक. मागील दोन वर्षांच्या करोंना काळानंतर अमेरिकेत प्रत्येक पांच व्यक्तींपैकी एक व्यक्ति मानसिक आजारणे त्रस्त आहे. ‘भुता परस्परे जडो मैत्र जिवांचे’ असे उगीचच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेले नाही.
असो. खरे तर माझ्या दृष्टीने हा एक अकस्मात ध्यानीमनी नसतांना घडलेला चमत्कार आहेअसेच म्हणावे लागेल.
नको आता म्हणणे, फुका माझे माझे |
सर्वची करणे आता हे, जगद् कारणे ||१||
आता कसा ओढू, माझेच ताटात |
सर्वांचेच ह्यात भाग्य असे ||२||
माझे माझे काय, सांगू मी कुणाला |
कशासाठी व्यर्थ, आटापिटा ||३||
देवाने जे दिधले, माझे रूपामध्ये |
नलगे ते सारे, माझे माझे ||४||
नको सोस जीवा, आकंठ बुडून |
विसरून हरीच्या, नामरूपा ||५||
मनी माझे आता, भरो भक्तीभाव |
न चळो चित्त, क्षणभरी ||६|| [मुकुंदायन]
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
१२-१२-२०२२ | सायंकाळ: १८:०७