Marathi

हीच असे खास बात……….

बस आता राहिले आहे, फक्त चोवीस तास,
गोव्याला पोहचायला, हीच असे खास बात……….

महीने किती गेले उलटून, विचार नुसता करत होतो,
असे जाऊ तसे जाऊ, योजना नुसत्या आखत होतो………..

शेवटी आता एकदाचा, सापडला बरं मुहूर्त,
चतुश्चाकीने जाण्याचा, करत आहे प्रयत्न…………

लांब लांब रस्ते अन, मोकळे मोकळे आकाश,
भुरभुर वाहे वारा अन, छान छान आहे प्रकाश…………

लहानच आहे कार आमची, पण राजेशाही आहे थाट,
मंद मंद हवा आहे, गाण्याचा आहे आगळा थाट………….

वामभागे हसतो रवी, विचारत आहे कुठे कुठे,
सांगून त्याला टाकतो मी, अभिरामला भेटायला रे…………..

बीड आणि सोलापूर, मंगळवेढा कोल्हापूर,
निवास तिथे देवीचा, मांगल्य असे सर्वदूर…………

पुढे प्रवेश सागरतटी, असणार मध्ये खूप डोंगर,
उंच सखल रस्ते असणार, दिसतील झाडे दूरवर………..

आगळा वेगळा प्रदेश असेल, नवीन असतील तिथले लोक,
कोंकणी बोलत असतील “माका नाका”, आनंदी असणार सारे लोक…………

वळणा वळणातून जाईल, वाट आमची इथे तिथे,
अभिराम कुठे दिसतो कां, शोधेल नजर जिथे तिथे ………….

आनंद काय वेगळा असतो, सांगा बरे तुम्ही मला,
नातू असा धावत येऊन, आनंदाचा फुलवेल मळा……….


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
| ५ जानेवारी २०२३ | सकाळी – ०६:५५|

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top