येताच कल्पना चौकशीची,
आठवे जंतरमंतर तात्काळ,
म्हणे आरक्षण सर्व स्त्रियांसाठी,
एवढेच एक मागणे असे………
साधले कसे संधान उत्तरेशी,
न कळे मंत्र गुप्त यांचे,
मांजरास वाटे मिटले हे डोळे,
कुणास कैसे कळेल हे……..
पैशाची भाषा असे जोरदार,
उघडते दार कोणतेही,
हिंदीचा तो द्वेष अन्यथा करती,
परि स्वार्थापायी गळाभेट……
विसरती सारे वैरभाव आपुले,
शोधती लसावी लोभ करण्या,
अंतरात अशांती धनार्जनाची,
वायु्याने उड्डाणे कोट्यानकोटी……
राजकीय समीकरणे वेगळीच यांची,
परि अर्थशास्त्री महान हे,
साधण्या स्वार्थ अर्थसत्तेचा,
राजकीय सत्ता पायातळी…….
लोका भासविती लोककल्याण,
गुप्त यांचे धोरण आप्तेसाष्टांचे,
नसे लज्जा कसली किंचित यांना,
म्हणे लोकतंत्र धास्तावले…….
समजती लोका निर्बूद्ध ऐसे,
करती मार्गक्रमण सारीकडे,
वाटे न भिती कशाचीही यांना,
फौजा वकिलांच्या दावणीला……
करती आदळआपट रात्रंदिन ऐसे,
जैसे लढती लोककारणे,
सत्यरूप यांचे आतले वेगळे,
शुभ्ररूप बाह्यांगी भासविती……
अचानक प्रभाती आठवे राष्ट्रपिता,
पुर्वरात्री भोगती अपेयपान,
गेली कुठे विझून आत्मज्योत यांची,
पेटविती मेणबत्त्या बाहेरच्या ……
लोकांचीच सत्ता बनविली दासी,
वाटतसे भिती रात्रंदिन,
नियतीचा प्रहार न कळे कुणा,
शेवटी होणार शिशुपाल…….
अरे देवा कैसा तुझा हा खेळ,
सगळेच काळे बुद्धीबळी,
होणार केंव्हा शक्तीप्रधान,
करणार पापनृपा बंदिवान……..
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
11 मार्च 2023
सकाळी: 09:52