Marathi

आनंदयात्री

आलो जरी इथे मी, मन थांबले किनारी,
गोमंतका किनारी, दिसती सुरम्य लहरी………

विष्णूस्य एक रूप, परशुरामी प्रगटले,
मेरू महापराक्रमाचा, ऋषीरूप धन्य झाले……..

जमदग्नी पितृरूपे, दिधले पराक्रमाला,
त्या लाभला जिव्हाळा, माता रेणुकेचा………..

शिवभक्त दृश होता, सर्व भूमि दान केली,
कश्यपास अवघी, अवनीच दान केली…….

गेला निघुनी तेंव्हा, तो महेंद्र पर्वताशी,
केले प्रसन्न वरुणा, दिली भूमी तयाशी……..

स्वपराक्रमे ढकलला, त्या सागरास मागे,
केली अपरांत भूमी, गुजराथ केरळाची…………

तो फेकता हस्तपरशु, शूर्पारक प्रगटला,
ते क्षेत्र जन्मले ते, द्विजक्षात्र तो प्रगटला……….

त्या पराशुरां क्षेत्री, रांगा तिथे सभोवती,
आकाश स्वच्छ तिथले, किती वायुयाने फिरती……

तेथे वनांत हिरवे, ते वृक्ष छान असती,
वाटा किती सुबक त्या, ऐशा सुरेख दिसती……..

नाही कुठे गलबला, नाही लगीनघाई,
सारेच शांत तिथले, रस्त्यात नाही घाई………

दर एक दिवस तेथे, जत्रा कुठे तरी ती,
सारेच मुक्त तेथे, घाईच उत्सवाची………..

तो कार्निव्हल तिथला, तरुणास साद देई,
मोठ्यास बालकांना, सर्वास साथ घेई………..

आनंद बागडे तो, फुलता वसंत सारा,
फिरती मजेत सारे, किती वेगळा नजारा………

सगळेच ते प्रवासी, आनंदयात्री सारे,
ना धर्म जात तेथे, जगती मिळून सारे……….

ते धुंद मुक्त सारे, आयुष्य ते निराळे,
आनंद जीवनाचा, घेती मिळूनी सारे………..

उन्मुक्त असती सारे, ते मुक्त असती सारे,
ते रंग जीवनाचे, मंगेश देई सारे …………

दु:खास विसरुनिया, जगती यथेच्छ सारे,
आनंद जीवनाचा, मस्तीत मस्त सारे………..

ती शक्ती शांतदुर्गा, सर्वांस सर्व देई,
हसरा निसर्ग सारा, सर्वस शांती देई…………

प्रेमात चिंब सारे, अवघा निसर्ग सारा,
जत्रेत शोधती ते, उत्साह तो निराळा……….

हसतो निसर्ग सारा, मन मोहवी किनारे,
उधळून स्नेह सगळे, जगती कसे निराळे……….


(c) मुकुंद भालेराव<br>
छत्रपती संभाजी नगर<br>
भ्रमणदुरध्वनी क्रमांक: ८३०८८ ३५३१३<br>

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top