Marathi My Poems

तरी सांगून सर्व गेली

अमेरिकेच्या पश्चिमभागी,
प्रशांत सागर असे मनोहर,
हवाई बेटे निळीजांभळी,
स्वप्नसरीसे असती सुंदर……..

ओळख झाली अशी अचानक,
काव्य वाचले आंतरजाली,
कसे मलाही ना कळले ते,
कळले तिजला अंतर्यामी……..

एक दिवस ती अशी अचानक,
अवतरली मम स्वप्नपुरी,
पूर्वजन्मीचे नाते स्मरता,
धावत आली मम नगरी……..

साध्या आपल्या लालपरीची,
गंमत तिजला आवडली,
अंतरातल्या ओढीने ती,
त्वरे पहुचली स्वप्नपुरी……..

साडी लेवुनी अंगावरती,
लाल गुलाबी सुंदर ती
लुकलुकणाऱ्या डोळ्यांमध्ये,
संदेशांची महफिल ती………

वार्यावरती उडती कुंतल,
सरसर वारे अंगावरती
पदराची ती फडफड होते,
रानामधल्या वार्यावरती………

सस्मित चाले सखी अशी ती,
डोलत डोलत बांधावरती,
नयनामध्ये भाव मनोहर,
पदर सावरीत अंगावरती………

मारीया ते नांवमधुर ते,
गत जन्माचे नाते कां,
पार करुनी सप्तसागरा,
पुन्हा भेटण्या आली कां……..

शेतामधल्या बांधावरती,
उडते मन हे आकाशी,
पार करुनी सहस्त्र योजने,
सखी आली ती गावाशी……….

अतर्क्य कैसे नाते आमुचे,
न कळले कैसे घडले हे,
मला न उमगे नाते आमुचे,
कसे उमलले ऐसे हे………..
सात समुद्रा पलीकडे ती,
हवाईच्या त्या बेटावरती,
रत्नाकर तो निळीशारही,
शाल पांघरली अंगावरती…….

ते ऊर्ध्वगामी सुळके,
हिरवे जसे मनोरे,
त्या शांत पर्वतांचे,
निळ्या जळात चेहरे………

तिकडे पल्याड दिसती,
वस्ती बरी घरांची,
पाण्यात सावली दिसे ती,
काळ्याभुर्या ढगांची……

कुठे प्रचंड दिसती,
जणू डोंगरी बुरुज ते,
पाण्यात विहरती ते,
शत थवे जलचरांचे……….

माथ्यावरी पलीकडे,
स्पर्शून मस्तकाला,
जणू देखणा पसरला,
नभशुभ्र मुकुट झाला……..

घनदाट जंगलातील,
ती वाट पावलांची,
उडती सुरेख पक्षी,
त्या शुभ्र जलप्रपाती…….

होताच सांध्यवेळा,
रवी अस्ताचलास गेला,
संध्याच सोनियाची,
मनी हर्ष तो पसरला……

पुढे निघून जाता,
दिसतो निळा किनारा,
निळ्या नभास जैसा,
बिलगुनी प्रसन्न झाला……..

ह्या रानझाडीमध्ये,
वाटे तिला रमावे,
रमणीय स्थान ऐसे,
विसरून न जावयाचे…….

हर्ष मानसी तिला मिळाला
छोट्या सार्या वस्त्यानी,
भटकत भटकत इथे विहरली
विसरून गेली दु:खाशी…….

उडून गेले दिवस असे ते,
डोळे ऐसे भरून आले,
स्वप्नपुरीच्या स्वप्ना जैसे,
पुन्हा न लाभे दिवस असे……..

नेत्रात मारियाच्या,
तरळून पाणी आले,
दु:खी मनात झाली,
नीर गालावरी पसरले ………

पुन्हा परतीचा प्रवास,
हवा तो लालपरीचा,
खिडकीत त्या किनारी,
तव हाक आली हृद्या……..

आसवे भरुनी गाली,
अस्तास सांध्यकाळी,
नयनात मारियाच्या,
दु:खे अशी तरळली……….

उंचावूनी कराला,
बोलाविले प्रियेने,
तिच्या नजीक जाता,
मम नयन स्पर्शिले कराने……….

ती कल्लोलिनी त्वरेने,
मम अन्तरात शिरली,
काहीच शब्द नव्हते,
तरी सांगून सर्व गेली…….


मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
३० मार्च २०२३
रात्रो: ००:१०

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top