झटकू नकोस पाणी
केसात थांबलेले
रोखू नकोस तुजला,
मन लुब्ध जाहलेले…….
फसवी किती मनाला,
खोटीच ती कहानी,
जे स्पर्शले मनाला,
का थांबवी तयाशी………
हृद्यात थांबले ना,
नयनात अश्रू असती,
श्वासातली गतीही,
वदते खरी व्यथाही…….
होताच सांजवेळा,
दिशा फुलुनी आल्या,
साऱ्या नभात जैशा,
कलिका फुलुनी आल्या…….
हसती नभात साऱ्या
त्या तारका शशीच्या,
नयनात फेर धरती,
साऱ्या सख्या शशीच्या……
त्या तारका नभात,
नयनात नृत्य त्यांचे,
स्मितहास्य शब्द कुसुमे,
केसात तारकांचे……..
त्या वाहत्या प्रवाही,
ते बिंब तव रूपाचे,
हसता तिथे तू तेंव्हा,
तो पारिजात बरसे…………
कुंतलात शुभ्र फुले,
कुसुमांची आरास अशी,
माळलेली रम्य फुले,
कुजबुजती छान अशी…….
वल्कलात शांतसौम्य,
दिव्यरूप बहरले,
पैजणांचे मधुर ध्वनी,
पदन्यास मनी वसे……..
भ्रमरगुंज वाटते,
सांध्यकाळी रम्यवनी,
चित्त मुग्ध हरवते,
काननी वनांचली…………
मोह तुझा मनोमनी,
भास तुझा क्षणोक्षणी,
जीव दंग जाहला,
श्वास मधुर ह्या मनी……..
गूढ रम्य संधीकाळी,
चित्त दंग जाहले,
जलात रूप पाहीले,
मीच मला पाहीले……..
मिटता द्वैत सखे,
वेगळे न राहिलो,
श्वासश्वास एक असे,
एकरूप जाहलो………
आता न राहिले तुझे,
अस्तित्व मम विभक्तही,
आता उगाच शोध नको,
श्वास आता एक लयी………
शब्द अर्थ तेच ते,
बाह्य रूप तेच दिसे,
अंतरात मात्र सकल,
बदलले विश्व असे…….
आता न शोध घ्यायचा,
तुला मलाच कुठला,
एकरूप एकचित्त,
संचीत कुंभ पावला…….
(c) मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
२१-०४-२०२३
दुपारी: १५:३५