कोण म्हणत सौंदर्य
फक्त दिसण्यात असते,
नाही, हे पूर्णपणे खरे नाही,
दिसण्यात तर असतेच,
हे खरे आहे……
पण पाह्णार्याच्या
नजरेत असते
हे सुद्धा खरे आहे………
फुलातले असो
वनातले असो
बर्फातले असो
सरितेचे असो
किंवा तारकांचे असो…….
इतकेच काय पण,
काव्यातले
कथेतले
नाटकातले
चित्रातले
गाण्यातले
सतारीतले
विणेतले……….
चित्रकाराच्या कुंचल्यातले
गायकाच्या आलापातले
वादकाच्या हरकतीतले
वक्त्यांच्या वाणीतले
वेदातल्या ऋचातले
याज्ञीकांच्या स्वाहाकारातले
वेदपाठकांच्या लयकारीतले
साधूच्या भक्तीतले
नर्तकीच्या पदन्यासातले
अभिनेत्रीच्या भावमुद्रेतले
योग्याच्या समाधीतले
संन्याशाच्या विरक्तीतले
वाहणाऱ्या निर्झरातले
बरसणाऱ्या चांदण्यातले
वायूच्या लहरीतले
डोलणाऱ्या नावेतले
सागरलाटांच्या नृत्यातले
भक्ताच्या भक्तीतले
गुरूच्या शक्तीतले
साध्वीच्या मौनातले
नि:शब्द अंतरातले
अनाहत ध्वनीतले
ओंकातील प्रणवाचे
मुलाधारातील उर्जेचे
सहस्त्रदलातील आनंदाचे
कुम्भकातील शान्ततेचे
शून्यातील नसण्याचे
अस्तित्वाशिवाय राहण्याचे…….
निर्मोही चित्ताचे
विरक्त वृत्तीतले
अर्थांचा धांडोळा घेणाऱ्या
नित्यशुद्धबुद्धमुक्त
मनोव्यापारातले………..
निरातीत
शब्दातीत
श्वासावर केंद्रित केलेल्या
मनोवृत्तीतले……….
सौंदर्य खरेतर
अवार्णनीयच असते,
त्याची परिभाषाच
करता येत नाही……..
बघा ना !
रिंगणात वारकर्यांच्या
थिरकणाऱ्या पायाकडे
एकानादात एकातालात
बेभानपणे विठ्ठलभक्तीत
टाळमृदंगाच्या आवाजात
गुंग झालेल्या वारकर्यांच्या
जयहरीविठ्ठलच्या गजरात
देखील अनोखे सौंदर्य आहे………..
कुठे नाही सौंदर्य?
अवघ्या विश्वात भरून उरलय ते…….
अगदी एव्हरेस्टच्या शिखरापासून तर
रामेश्वराच्या धनुष्कोडीपर्यंत
द्वारकेतल्या कृष्णाचे
पदप्रक्षालन करणार्या
सिंधु सागरापासून
तर त्रिपुरेश्वरीच्या
धीरगंभीर मन्दिरापर्यंत………
इथे तिथे सगळीकडे
कणाकणात
आहे सौदर्य ओतप्रोत…..
तरीही लोक म्हणतात
या जगात जगावे कसे !!!!!!!!
ज्यांना असा गहन
प्रश्न पडतो नां,
त्यांना खर तर
स्वत:च्या अंत:करणात
डोकावून पहायला हवे,
आणि ते ही
त्रयस्थासारखे,
निष्पक्षपणे,
साधू आणि सन्यासी
जसे जगाकडे पाहतात तसे…….
त्रयस्थपणे निर्विकारपणे,
ना लोभ, ना मोह, ना माया ,
ना आकर्षण, ना मत्सर,
पण पहायचे मात्र
‘सुक्ष्मपणे’
आनंदशोधयात्री बनून
व मग बघा
कित्ती अमर्याद आनंद आहे……..
संगीतातील सर्व प्रथम राग
‘यमन अर्थात यमन कल्याण’,
संगीतात तेच सात स्वर,
सा रे ग म प ध नी
आरोह तेच व अवरोह तेच
जाती तीच आणि तरीही……….
गुलाबाच्या बागेत
बहरलेल्या सारखा
डोलणारा पंडित भीमसेन जोशींचा
यमन वेगळा,
जलाशयातल्या सुंदर
लहरींसारखा मोहक
स्मितहास्य करणारा
हरीप्रसाद चौरसियांच्या बासरीतून
प्रगटणारा यमन वेगळा,
हरकतींनी नयनरम्य
नृत्याकृती निर्माण करणारा
पंडित बसवराज राजगुरूंचा
यमन निराळा,
दलसरोवराच्या सुरम्य
जलाशयामध्ये हळुवार
जलबिंदूचा स्पर्शरूप
पंडित शिवकुमारांचा
यमन आगळाच,
थिरकणाऱ्या नटखट
नृत्यांगनेचा मनोहारी
आभास निर्माण करणारा
उस्ताद राशीद खांचा
यमन निराळा,
धीरगंभीर स्वरमंडळाचा
अभूतपूर्व प्रत्यय आणून देणारा
उस्ताद बडेअली गुलामखां साहेबांचा
यमन अफलातूनच कि,
मनमुरादपणे डोलणाऱ्या
नौकेगत मोहविणारा
पंडिता मोगुबाई कुर्डूकरांचा आणि
पंडिता हिराबाई बडोदेकरांचा
यमन वेगळ्या धाटणीतला,
जुने आलाप व नव्या ताणांना
एकत्रित गुंफून राधाकृष्णाच्या
रासलीलांचा आभास
निर्माण करणारा
शंकरमहादेवनचा
चित्ताकर्षक
यमन तर भन्नाटच,
किती अदा ! किती नजाकती !
स्वर तेच पण आकृती
विभिन्न !
कशात नाही सौंदर्य ?????
प्रत्येकाची अदाकारी
सौंदर्याची खाणच !!!!!
पंडित बिरजू महाराज,
हेमा मालिनी किंवा वैजयंती माला
कृष्णभक्तीत लीन झाल्यावर
विविध भावमुद्रा, नेत्रांची वलये,
हातांची आंदोलने,
पायांची आवर्तने,
रंगमंचावर
तोच कृष्णसखा
उभा करतात पण त्यातही
प्रत्येकीचा रंग माझा वेगळा !!
सौन्दर्याच्या किती छटा !
केदारनाथच्या रस्त्यावर
उंच पर्वतरांगावर
अभिषेक करणाऱ्या
जलधारा,
सिंधुसागरगंगासागर व हिंदूमहासागराच्या
संगमावर अभिषेक करणारा कन्याकुमारीतील
जलदूत,
लडाखच्या डोंगरांनी वेढलेल्या
सपाट भूपृष्ठावर सरसर
ओघळणारा
जलसम्राट,
सगळेच सुंदर,
तसुभरही कमी नाही………
मग मला सांगा
सौंदर्य म्हणजे
नक्की काय असते
व कसे असते हो…..
जिकडे पहावे तिकडे
सौंदर्याचा महापूर……..
भरभरून दिलेय परमेश्वराने
आणि
या सर्वांची अनुभूती अनुभवण्याकरीता
एकशेऐंशी अंशातून
प्यानोरामा दृश्य पाहण्याकरिता
नेत्रयुगल दिलेत,
चहूबाजूंनी येणाऱ्या
ध्वनीच्या आवर्तनांना
श्रवण करण्याकरिता
श्रवनेन्द्रीय दिलेत,
रंगध्वनीचे
आस्वादसुख मिळण्याकरीता
सर्वगुणसंपन्न
‘मन’
दिलय व त्याला प्रेरित करण्याला
चित्त व हृद्य पण दिले…….
खर तर आम्हाला
फक्त
ईछाच
करायची आहे,
बाकी सगळे तर
तोच करणार आहे,
कारण श्रीकृष्णाने तर
सांगूनच ठेवल आहे की,
तो आपल्या मनातच निवास करतो…….
गंगौघासारखा नितळ, पारदर्शक, तरल,
स्वच्छ, आकर्षक, मनोहर, सप्तरंगी,
सुगंधी, सुमधुर, अनिर्वचणीय………..
हवा तितका स्विकारा, पण
ते एक परमेश्वराचे
पसायदान
समजून,
ज्ञानेशाच्या मनोरम वृत्तीने,
मीरेच्या अविच्छिन्न भक्तीने,
महर्षी नारदांच्या अविरत
हरीनामसंकीर्तनाने,
तुकोबाच्या चिपळ्यान्च्या,
नादात भिजलेल्या
भक्तीविभोर मंगलशब्दाने,
आणि नाथांच्या अतिकोमल हृदयाने…….
एकदा का मनोवृत्ती अशी प्रासादिक
तयार झाली कि, मग
मुलाधारापासून सहस्त्रदलापर्यंत
सळसळत जाणार्या
कुंडलिनीसारखी
आनंदाची
अव्याहत गंगा गोमुखातून
गंगोत्रीपर्यंत अवखळपणे
सागराच्या ओढीने
धावत येऊन हरिद्वारात
शांतस्वरूप दयार्द्र होते,
व मग अनिर्वचनीय
सात्विक समाधान मिळते
तसेच
अलौकिक सहस्त्रदलातून
शरीराच्या अणुरेणूत प्रवाहित
होणार्या अमृतकणांनी
अंगप्रत्यंग अमृतमय होऊन जाते………
अजून काय हवे व कशाला हवे !
मग वाट कशाची पहात आहात तुम्ही?
तत् दु:खम् क्षिप्त्वा पुन: आरम्भमं करोतु |
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक : ३ जून २०२३
सायंकाळी:१९:५४