माझ्या मनात सारे
आकाश साठलेले
वर्षा विमुक्त करण्या
आवर्त दाटलेले………
मी शोधले मनाला
माझ्याच अंगणांत
परी ना मिळे मला ते
माझ्याच अंतरात…………
हे जाहले कसे हे
उमगे मला न कांही
शोधू कुठे मनाला
सांगेल कोण कांही………..
कुणी सांगती मला ते
ध्यानात गवसते ते
कुणी सांगते प्रगटते
मंत्रातुनी तसे ते……………..
त्या डोंगरी कपारी
सोडून अन्नपाणी
मी त्यागले क्षुधेस
सर्वास त्यागूनी मी……….
किती काळ मी तसा तो
फिरलो नदी किनारी
आत्म्यास शोधण्याला
विसरून मी मलाही………
मी मुक्त त्या वनात
मनास शोधिले मी
शिणलाच जीव माझा
परि भेट ना मनासी………
अवचित एक ऐसा
ध्वनी गर्जला वनात
अरे शोधसी कशाला
स्वत:स अत्रतत्र………….
जा परतुनी घराला
सारे तिथेच आहे
तव अंतरात सारे
ब्रम्हांड भरून आहे………..
हा शोध व्यर्थ करीसी
ते अंतरात तुझिया
कैसे न आकळे ते
हा व्यर्थ शोध सारा……
जो प्रश्न करितो तुजला
ते रूप ईश्वराचे
त्याचेच नाव ‘मन’ रे
ते अंतरात आहे……….
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ०७-०६-२०२३