मेघ तर आबालवृद्धांना आवडतो. मलाही आवडतो अन तुम्हालाही. लहान मुलांना पाण्यात खेळायला, डुंबायला आणि दुसर्यांच्या अंगावर पाणी उडवायला देखील. तरुणांना-तरुणींणा दोघांकडे छत्र्या असूनही मुद्दामच एकाच छत्रीत अगदी श्री ४२० मधील राज कपूर व नर्गिसच्या ‘प्यार हुवा इकरार हुवा’ प्रमाणे गाणे म्हणत (मनात का होईना) फिरायला आवडते श्लो मोशनमध्ये.
जंगलामध्ये जाऊन पर्वत शिखरावर कोसळणाऱ्या जलधारा पहायला,
अथांग समुद्रावर अविरत बरसणाऱ्या मनमुराद पावसाला अन्नप्रसवा धरतीचे प्रेमाने चुंबन घेणारा,
रूपे विविध, भाग विविध, आवाज विविध, संगीत विविध,
शेतकर्यांच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसून मृग नक्षत्राच्या पहिल्या सरीने त्याच्या चेहर्यावर स्मितरेषा उमटविणारा दयाद्रपर्जन्य पहायला,
नुकत्याच विवाह झालेल्या नवपरिणीत युगलांच्या मनोमिलनाला सुरेल साथ देणारा,
छोट्याशा झोपडीवजा घराच्या अरसदारी, सतरंजी पसरून समरसतेने मेघ मल्हारच्या ताना घेण्यात आकंठ बुडलेल्या गवयाचा अभिन्न हृदय बनणारा प्रेमळ हर्षद मेघ,
रिमझिम पडणारा पाउस, मध्यमगतीचा पाउस, भरधाव घोड्याच्या टपटप आवाजासारखा वाटणारा पाऊस, युध्दभुमीवर रणशिंग फुंकल्यानंतर कानठळ्या बसविणाऱ्या प्रचंड रणदुंदुभीसारखा भयावह प्रकारचा जणू कोपलेला मेघ.
उस्ताद पद्मभूषण आमीर खां साहेबांचे मेघमल्हारचे आलाप कमी लांबीचे पण भारदस्त, जशा पाण्याच्या छोट्या छोट्या लाटाच, तर भारतरत्न भीमसेन जोशींचा आलाप व त्यांच्या ताना ह्या लांब पल्याच्या समुद्राच्या लांबपर्यंत संथ व शांतपणे जाणार्या लाटासारख्या, तर उस्ताद पद्मभूषण रशीद खान यांच्या ताना उंच उसळणार्या लाटांसारख्या. तिघांच्याही गाण्यामध्ये स्वर तेच, आरोह-अवरोह सुद्धा तेच, वादी-विसंवादी स्वर तेच, तरीही प्रत्येकाच्या गाण्याची नजाकत वेगवेगळीच, खुमारी वेगळीच, मजा वेगळीच व डोळे मिटल्यानंतर येणारी अनुभूती सुद्धा वेगळीच.
हिरव्यागार सळसळणाऱ्या पानांच्या कोमल पर्णसृष्टीशी प्रेमळ लगट कराणारा मुक्त पाउस,
प्रात:कालच्या केदारनाथाच्या काकड आरतीच्या घंटानादाला आपल्या अलौकिक तालबद्ध नादाने वेडावणारा हिममित्र पाउस आगळाच,
महाकाय हिंदू महासागराला जणू सदैव आशीर्वाद देणार्या रामेश्वराच्या मंदिराला अभिषेक करणारा धीरगंभीर पाउस,
कित्ती रूपे, कित्ती आकार, कित्ती नाद, कित्ती निनाद, कित्ती स्वर, सुस्वर मनोहर पाउस,
एखाद्या उस्तादाला मेघ मल्हार गावा वाटतो, तर दुसऱ्याला मियान्की मल्हार, रानातल्या छोट्याशा घरातला पंडित नट मल्हार गातो, नवीनच गाणे शिकणारी तरुणी सरळच एखाद्या अनवट मल्हाराच्या प्रकाराकडे वळते,
तसा मेघ मल्हार हा मल्हारच्या अंगाने गायल्या जातो. भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ठ्य असे आहे कि, त्यात ऋतूप्रमाणे व दिवसाच्या (म्हणजे अहोरात्र) समयानुसार रागांची एक विशिष्ट वेळ ठरलेली आहे. राग मेघमल्हार सारखाच मधुमाद सारंग हा राग सुद्धा आहे, पण त्याच्या गाण्याची पद्धती जरा वेगळी आहे. मेघ मल्हार हा काफी थाटातून उत्पन्न झालेला आहे असे म्हणतात. हा राग कोमल निषादपासून सुरु होतो. या रागात एकूण पांच स्वर आहेत, नि, सा, रे, म, प. या स्वर समुहाला ‘ओडव’ असे म्हणतात. याचा वादी स्वर ‘सा’ असून त्यापेक्षा कमी वापर होणारा स्वर आहे ‘प’ आहे. रे व प या दोन स्वरांच्या संयुक्त उपयोगाने रागात एक नजाकत निर्माण होते. या रागात ‘ध’ व ‘ग’ हे दोन स्वर निषिद्ध आहेत. यात मध्यम खूप प्रभावी असतो. कुणी कुणी यात कोमल गंधारचा पण उपयोग करतात. भारतीय शास्त्रीय संगीतात बंदिशीला फार महत्व आहे. [मराठी ज्ञानकोश]
पावसाळ्याचे निमीत्ताने जमलेले तरुण शुद्ध मल्हार, धुलिया मल्हार, मीरा कि मल्हार, सुर मल्हार, गौड मल्हार आपआपल्या तयारीप्रमाणे आळवतात,
तसे पहिले तर ‘आकाशात् पतीतं तोयं, यथा गच्छती सागरं…..’
कुठेही कोसळणारा मेघ, डोंगरावर, दर्याखोर्यात, रानावनात, वाळवंटात, सपाट भूप्रदेशावर, समुद्रात, तळ्यात, ओढ्यात, निर्झरात, विहिरीत, घराच्या डोक्यावर, मंदिराच्या कळसावर, मुलांच्या अंगावर, कार्यालयातून घरी जाणार्यांच्या दुचाकीवर, भरधाव वेगात धावणार्या चतुश्चाकीच्या काचांवर, एखाद्या प्ल्यास्टीकच्या तुकडयाने आपल्या झोपडीला जपू पाहणाऱ्या अर्धेअधिक अंग उघडे असणार्याला भेडसावणारा पाऊस,
खर तर ‘थोडासा रुहानी हो जाय’ या हिंदी चित्रपटामध्ये अगदी शाळेत पाठ करून आल्यागत ‘आपला नाना‘ (नाना पाटेकर) पाण्याला विविध भाषेतील समानार्थक शब्द धडाधड म्हणून दाखवतो…..पाणी, वारी, जल, निर, जीवन, H2O व मग पुढे तामिळ, तेलगु वगैरे भाषेतील अपरिचित नावांची भलीमोठी लांबलाचक मालाचा हाकतो…….
तसे तर श्री अमरसिहांच्या अमरकोषात, ह्याच कोसळणाऱ्या जलधारा म्हणजेच पाण्याला, आप, स्त्री, भूम्नी, वार्वारी, सलीलं, कमलं, जलाम्, पय:, किलालम्, अमृतं, जीवनं, भुवनं, वनं, कबंधमुदकं, पाथ:, पुष्करं, सर्वतोमुखम्, अम्भोर्ण, अस्तोय, पानीय, नीर, क्षीर, अम्बु, शम्बरम्, मेघपुष्प, घनरस, आप्यम्, अम्मयम्, अशी भरपूर नावे आहेत.
इतके असले तरीही ‘मेघ’ म्हटले कि, खरे तर दोन तीन प्रतिमाच डोळ्यासमोर येतात…..आकाशातून पडणारा, गायकाच्या सुरेल स्वरातुन प्रगट होणारा, कवीच्या शब्दधारांमधून प्रत्ययास येणारा, अन ममत्वाने धरणीच्या ओढीने अंतरिक्षातून प्रीतीने प्रेरित होऊन बरसणारा, इंद्रधनुच्या सप्तरंगाने बेभान करणारा, सुखकारक, मनोहारी, लयबद्ध, धरतीला अभिषेक करणारा मेघ,
त्याही पुढे जाऊन मित्रसखा व प्रामाणिक संदेशवाह्क बनून कालिदासाच्या सुरम्य कल्पनेने यक्षाच्या प्रेयसीकडे प्रेमाचा निरोप घेऊन जाणारा अवर्णनीय मेघदूत……..कित्ती कित्ती म्हणून रूपे वर्णावी याची……..
याला पाहून आचार्य अत्र्यांना ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ सुचले, तर किर्लोस्करांना ‘नभ मेघांनी आक्रमिले’ (संगीत सौभद्र, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, राग-मल्हार, प्रभाकर कारेकर ), तर अजून कुण्या शायराला ‘रिमझिमके गीत सावन गाये’ (अंजाना-१९६९, आनंद बक्षी-महम्मद रफी-लता मंगेशकर) ‘सावनका महीना पवन करे शोर’ (मिलन-१९६७, आनंद बक्षी, मुकेश-लता मंगेशकर) सारख्या सुरम्य गोड रचना सुचतात. चित्रपट दिग्दर्शकाला १९७६ ला आलेल्या कभीकभी मधील अत्यंत शृंगारिक ‘प्यार कर लिया तो क्या’ हे साहीर लुधीयानवी यांनी लिहिलेले खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले व किशोर कुमार यांनी गायीलेले अत्यंत लोकप्रिय गाणे करावेसे वाटते. त्याचवेळी कवि ग्रेसला ‘पाउस कधीचा पडतो’ सुचते, रिमझिम पाउस पडे सारखा’ (गीत-पि. सावळाराम, संगीत-वसंत प्रभू, आशा भोसले) सुद्धा स्त्रवते. ‘तेरे नयना सावन भादो, फिरभी मेरा मन प्यासा’ (मेहबूबा-१९७६, आनंद बक्षी, संगीत-राहुलदेव बर्मन, किशोर कुमार) सारखे शृंगारिक गाणे देखील काळजाचा ठाव घेते.
मेघ आणि शृंगार यांचे नाते तसे फारच जवळचे आहेच, पण म्हणून कांही त्या पेक्षा श्रेष्ठ दुसरा रस मेघाला वर्ज्य आहे असे मुळीच नाही. हिंदी चित्रपटामध्ये उत्तान शृंगार, सात्विक शृंगार व विप्रलभ शृंगार असे सर्व प्रकार आढळतात, परन्तु वरकरणी ती सगलीच गाणी आनंदी असत नाहीत. विप्रलभ शृंगारामध्ये प्रेयसी / प्रियकराच्या आठवणीने बाहेर पाऊस पडत असतांना मल्हारयुक्त गाणे अनेक चित्रपटात आलेली आहेत.
कवि श्रीधरांच्या हरिविजय ग्रंथातील (https://vishwakosh.marathi.gov.in/25224/) गोवर्धन पर्वताचा प्रसंग आठवा. अवघ्या गोकुळाला एका गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाखाली आणून रुष्ट झालेल्या इंद्राच्या रागातून मुसळधार मेघाचे रूप घेणाऱ्या मेघराजाचा काय दोष? तो तर देवेंद्र इंद्राचीच आज्ञा पाळणार नां! पण त्या भयावह मेघाला गोकुळातील रहिवाशांनी आपल्या भक्तीरसाने पार नामोहरम करून टाकले होते. धो धो बरसला पण तो, तरी बिचारा काय करणार, जेथे विश्वाचा पालनकर्ताच आहे तेथे तो बापडा तरी काय करणार! निमुटपणे कोसळत राहिला, पण त्या भक्तीरसाच्या महापुरापुढे मेघ काय किंवा त्याला आज्ञा देणार देवेंद्र काय शेवटी नतमस्तक झाले. हा अभूतपूर्व भक्तिरसाचा महिमा अनुभवल्यानंतर मेघालाही जाणवले असेल कि शृंगारापेक्षा भक्तीरसच सरस आहे. मग याला ‘भक्तीमेघ’ हा रागाचा नवीन प्रकार म्हणावा का? काय असेल त्याचा आरोह व अवरोह? काय असेल त्याचा थाट? काय असेल त्याचा वादी व विसंवादी स्वर? कुणास ठाऊक. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आज हयात असते तर कदाचित त्यांनी अशा नवीन रागाची रचना करून सर्वमान्य केली असती.
यासारखा अवर्णनीय प्रत्यय चिरंतन आहे, तो म्हणजे पंढरपुरच्या वारीतला. पांडुरंगाच्या पदस्पर्शाने शहारून जाणार्या किंवा कमीत कमी आपली माहेरी पंढरपूरला आल्यावर भीमा नदीच्या पाण्यात हस्तपादमुख प्रक्षाळून त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दुरून का होईना दर्शन घेता यावे म्हणून टाळमृदंगाच्या नादात नाचत जाणार्या वारकर्यांना सचैल स्नान घालणारा भक्तसखा अमृतरूप जलराज अद्वितीयच म्हणावा लागेल! त्या टाळमृदुंगाच्या गजरात वारकर्यांच्या जोडीने रिंगणात फेर धरणारा भक्तसखा तर अविस्मरणीय व अमृतरूपच. त्याचे ते मोहमयी रूप तर विठ्ठलाला देखिल मोहित करत असेल. तो विठ्ठल देखिल स्वर्गातल्या इतर देवतांना सांगत असेल कि, हा मेघ स्वर्गात खरा बरसतच नाही, कारण याच जीव अडकलेला असतो हरीभक्तांच्या मांदियाळीत. याचा अमृत वर्षाव तो आषाढी वारीत भान हरपून ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ ह्या भावनेने देहभान हरपलेल्या मनसोक्त नाचणार्या हरीभक्तांवरच फक्त करीत असतो.
मेघाचे पदर किती, रंग किती, रूपे किती, उपमा किती ! प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी. गायकाची वेगळी, कवीची वेगळी, चित्रकाराची वेगळी, कथाकाराची वेगळी, पुराणीकांची वेगळी. कुणी सुरांचा भक्त, तर कुणी रंगांचा भक्त. कुणाला मेघाला पाहून नृत्य करावेसे वाटेल, तर कुणाला अभंग म्हणावासा वाटेल, दुसऱ्याला प्रणयी बिहाग गावासा वाटेल, तर कुणाला सतारीवर भूप वाजवावा वाटेल. एखाद्या चित्रकाराला लगोलग कुंचल्याने कांही आकार दृश्यमान करावेसे वाटतील, आणि एखाद्यात संत महन्ताला ध्यानस्त बसावेसे वाटेल. कुणी म्हणेल हीच तर अगदी योग्य वेळ आहे महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायची, तर दुसरीकडे बहिणभावाला पावसात फुगडी खेळावीशी वाटेल.
बघा ना, तेच आकाश, तीच धरती, त्याच जलधारा, पण कुणाला कशाची स्फूर्ती मिळतेय, आणि म्हणूनच बालकवी सारख्या श्रेष्ठ कवीला देखील श्रावणातल्या मेघाची भुरळ पडली होती.
रमणीय असेल ते दृश्य, ज्यात हिमालयाच्या अत्युच्च कांचनगंगा शिखरावर किंवा कैलासपती महादेवाच्या विस्तीर्ण श्वशुरप्रदेशात मनसोक्तपणे, विनिर्मुक्त, स्वच्छंदपणे सरसरसरपणे जशे एखाद्या मोत्याच्या माळेमधून मोठी ओळंघत यावे तसा आकाशाला स्पर्स्श करीत, शिवशंकराला रिझवीत, आनंदी करीत व शरीरात उरलेल्या हलाहलाच्या अंशाला आपल्या शीतल स्पर्शाने सहनीय बनवीत असेल, सकाळच्या तेज:पुंज भाष्कराच्या आनंदरूप सोनेरी किरणाने अवनीला सुवर्णमय करीत असतानाच त्या उत्तुंग नगाधिराजाला सुवर्ण पंचामृत जलधारांचा शिर्षकाभिषेक करणारा पवित्र, परोपकारी मेघ किती कृतकृत्य होत असेल, जणू काय अनंत पुरश्चरणे करून आपल्या इष्ट देवतेला वांछित वरदान मागणाऱ्या तपस्व्या सारखा प्रसन्न मनाने व नित्यशुध्दबुध्दमुक्त अंत:करणाने नतमस्तक होऊन आपल्या जलधारांनी ‘नको आता मज कांही, हेच रूप राहू दे, मिटले नयन मी जरी, हेच रूप पाहू दे|’ अशीच प्रार्थना करीत असेल. आपल्याला असे देवदुर्लभ रमणीय अविस्मरणीय स्वर्गीय विहंगम दृश पाहण्याचे भाग्य लाभो हीच प्रार्थना, त्या गोकुळातील कृष्ण बनलेल्या भक्तस्य अभिन्नहृद्य सहस्त्र नामांनीयुक्त विश्वप्रतिपालक अनंताला.
(c) मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १६-०६-२०२३ / शुक्रवार / मध्यरात्र : ०१:००