Marathi

श्रीविष्णूकृपाप्रसाद

आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ‘पंढरपूरची वारी’ हा एक परवलीचा शब्द प्रयोग ह्या निमित्ताने प्रचलित आहे, परन्तु ‘देवशयनी एकादशी’ हा शब्द प्रयोग मात्र तसा जास्त प्रचलित नाही. अर्थात वारकरी संप्रदाय किंवा सांस्कृतिक अभ्यासकांना तो निश्चितच माहित असणार यात तिळमात्रही शंका नाही.

देवशयनी एकदशीला भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने शयन करतात, यालाच आपण चातुर्मास म्हणतो. ब्रह्मवैवर्त पुराणात एक कथा आहे. ती अशी.

सूर्यवंशात मांधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होता, जो सत्यवादी आणि पराक्रमी होता. तो आपल्या प्रजेप्रती एकनिष्ठ होता. त्याची सर्व प्रजा समृध्द आणि सुखी होती. त्याच्या राज्यात कोणालाही कसलाही त्रास नव्हता आणि कधी झाला नाही. एकदा त्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही आणि दुष्काळ पडला. अन्न न मिळाल्याने लोक अतिशय दु:खी झाले. राज्यात यज्ञयादीही थांबले. ही आपत्ती पाहून एके दिवशी राजा काही सैन्यासह जंगलाकडे निघाला. अनेक ऋषींच्या आश्रमात फिरत शेवटी तो ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा या ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तेथे राजाने अंगिरा ऋषींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हटले की हे देवा! सर्व प्रकारे धर्माचे पालन करूनही माझ्या राज्यात दुष्काळ पडला आहे. यामुळे जनता प्रचंड दु:खी आहे. राजाच्या पापांमुळे प्रजेला त्रास होतो असे शास्त्रात सांगितले आहे. जेव्हा मी धर्मानुसार राज्य करतो, तेव्हा माझ्या राज्यात दुष्काळ कसा पडला? याचे कारण मला अजूनही कळू शकले नाही. तेव्हा अंगिरा ऋषींनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पद्म एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. व्रताच्या प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल आणि प्रजेला सुख मिळेल कारण या एकादशीच्या व्रताने सर्व सिद्धी मिळून सर्व संकटांचा नाश होणार आहे. या एकादशीचे व्रत प्रजा, सेवक, मंत्र्यांसह केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते.

मुनींचे हे वचन ऐकून राजा आपल्या नगरात परतला आणि त्याने एकादशीचे व्रत विधिपूर्वक पाळले. त्या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस पडला आणि लोकांमध्ये पूर्वीप्रमाणेच सुख-समृद्धी परत आली. त्यामुळे सर्व मानवांनी या महिन्यातील एकादशीचे व्रत करावे. हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहे. ही कथा वाचल्याने व ऐकल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो. अस्तु.
‘मूकं करोति वाचालं, पंघूम् लंघयते गिरिम |
यत कृपा त्वंहं वन्दे परमानंदं माधवं ||’
परमेश्वराची कृपा झाल्यावर कांहीही होऊ शकते, हा व असाच अनुभव अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शनात दिला, रामकृष्ण परमहंसानी स्वामी विवेकानंदांना दिला, ज्ञानेश्वर मुलीने रेड्याच्या मुखातून वेद वदवुन सार्यांना प्रत्यय आणून दिला. मी सत्प्रवृत्त आहे, पण संत वगैरे नाही. मला २-३ वर्षांपुर्वी असाच परम कृपाळू भगवान श्रीविष्णूच्या कृपेच्या अनुग्रहाचा अनुभव आला. मी संस्कृत शिकलो जरूर, परंतु अगदी संस्कृतमह्द्ये काव्य रचना करण्याइतपत संस्कृत मला नक्कीच येत नाही याची मला संपूर्ण कल्पना आहे.

तो दिवस होता बहुधा द्वितीया. त्या दिवशी अचानक मला वाटले कि कांहीतरी लिहावयाला हवे, पण काय……आणि मग जे घडले ते अनाकलनीय होते व आहे. डोळे माझे होते, हात माझा होता पण मी नव्हतो. मी लिहित नव्हतो. कोण लिहित होते माहित नाही किंवा कोण लिहून घेत होते हे मला सांगता येणार नाही. माझ्या द्वारे माझी हातातून जे कागदावर उमटले ते ‘विष्णूसुक्त’ ! तेच आज इथे उधृत करीत आहे.

http://www.mukundbhalerao.com/blog/2020/10/05/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4/

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top