Marathi

पहायचे तुला सखे राहुनच गेले……..

रहात होतो बरोबर तेंव्हा
पहात सारखा होतो,
तरी देखील वाटते मला
पहायचे सखे तुला राहूनच गेले……..

नवीन होता सहवास आपला
एक होऊन गेलो,
इतके जवळ होतो तरी
पहिले नाही का,
असे कसे वाटते बर
पहायचे सखे तुला राहूनच गेले……..

खूप आपण बोललो तेंव्हा
खुप सांगून गेलो,
ऐकले मी ही खुप वेळा
आणि तू ही ऐकले,
तरी आज वाटे मला
पहायचे सखे तुला राहूनच गेले…….

मीच मला पहात होतो
तुझ्यामध्ये मी,
दूर कुठे होती तू तर
कळले नाही मला,
एकरूप झालो तरी
राहून काय गेले,
सखे तरी तुला बघ पहायचे
राहूनच गेले……..

सांगून झाले ऐकून झाले
राहिले नाही कांही,
समोर उभी आहे तू
खरे सांगतो तुला
तरी तुला पहायचे सखे राहूनच गेले…….

केस होते लांबसडक
स्मरते मला सारे,
मधुर तुझे बोलणे होते
आठवते सारे,
मग असे वाटे का बरे
कळतच नाही
सखे वाटते अजून
पहायचे तुला तसे राहूनच गेले…….

बाहेर कुठे जात नव्हतो
गाव होते लहान,
न्यायालयी अधिवक्ता
आपली किती शान,
कौतुक सारे करत होते
जोडी किती छान,
अग इतके ते होते
होते खूप छान,
तरीही मला वाटत राहते
पहायचे तुला सखे राहूनच गेले…….

आजच्या सारखे जग नव्हते
हाय-फाय भुर्र्र्रर्र्रर्र,
शांत होते स्थिर सारे
छान होते सारे,
म्हणून मला वाटत असेल
पहायचे तुला सखे राहूनच गेले…..

गेली वर्षे निघून सारी
मोठे आपण झालो,
ओढ अजून तशीच आहे
सांगतो तुला स्मरून,
इतके सारे असले तरी
पहायचे तुला सखे राहूनच गेले……..

हरकत नाही सखे आपले
हात आहे हातात,
मन आहे गुंतून सारे
खरी आहे बात,
असे जरी म्हणत असलो
मन मानत नाही,
हट्टी आहे फार ,त्याला
समजतच नाही
म्हणून सांगतो खरे तुला
पहायचे सखे बघ राहूनच गेले……..

प्रेम माया डोळ्यामध्ये
आहे अजून फार,
दररोज पहात असतो
आपण आपली शान
तरी देखील वाटे मला
सखे तुला पहायचे राहूनच गेले………

हातामध्ये हात तेंव्हा
शब्दाशिवाय सारे,
तरीमसाये छान होते
आता वाटे का
पहायचे तुला सखे राहूनच गेले…….

आठव आहे नजरेमध्ये
किती बुडून झाले,
इतके जरी झाले तरी
नाही कां बरे वाटे,
हेच नाही कळत मला
उगाचच वाटे
पहायचे तुला सखे राहूनच गेले……..

शब्दामध्ये अडकून तेंव्हा
जादू कशी झाली,
मीच गेलो विसरून मला
कविता नवी झाली,
झाले तेंव्हा असे कसे
सांगता येत नाही,
पाहिले तुला कसे कसे
आठवत कांही नाही,
फिरून मी पहिले असेल,
वेळा सोळा हजार,
तरीही मन सांगते मला
पहायचे तुला सखे राहूनच गेले……..


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १३ जुलै २०२३
वेळ: सकाळ-०६:५५ / दुपार- १२:३५

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top