Marathi

पातंजली, शंकराचार्य आणि सिग्मंड फ्रोईड

दररोज खेळ चाले
हा खेळ कल्पनांचा,
थांबेल ना कधीही
हा खेळ कल्पनांचा………..

ती खोल विहीर ऐसी
काळी कभिन्न आहे,
काही न दृष्टिला ते
येई परी कसे ते……..

तैशाच ह्या मनाच्या
खूप खोल त्या तळाशी,
अतृप्त वासनांच्या
विषानना प्रजाती…….

त्या खोल वापीमधले
सर्पा म्हणे तो ‘इड’
फ्रोईड जलपुटाशी
‘इगो’ च संबोधित………

त्यांना सदैव वाटे
उड्डान ऊर्ध्वगामी,
अफाट विषमय त्यांच्या
साऱ्याच भिन्न जाती……..

यांच्या वरी जलाचे
ते बंध शांत स्थिर,
शमवीत कालकूटा
ते तर्कयुक्त धैर्य……..

परी विषमय सर्प काही
उड्डाण उर्ध्व करती,
वारीस छेडण्याचा
अक्षम्य यत्न करती………

तैशाच काही वेळां
भय ग्रासते जलासी,
ते दंश वासुकीचे
परि खंडती मनाशी……..

आपलाच रिपू जैसा
अनुचित भावनांचा,
तो साहण्यास दंश
मग प्रार्थना शिवाला………

ऐकून सुक्त-स्तवने
निलकंठ आदी योगी,
निप्पातन्या भुजंगा
आशिष देती योगी………

आशिष महेशाचे
फ्रोईडचा ‘सुपर-इगो’,
ते विषसर्परुपी इच्छा
आशिष हनन करतो……..

उपदेश अमृताचा
तो नाथ पार्वतीचा,
देई अवरुद्ध ऊर्जा
करण्यास बध्द त्यांना………

फुत्कार वासुकींचे
किती विकट ते तयांचे,
त्यांना हनन करण्या
आशिष ते शिवाचे………….

हा खेळ वासुकींचा
चाले अहर्निशी तो,
आधार मंत्रऊर्जा
नीलकंठ देत असतो……..

‘चंद्रमा मनसो जात:’
कधीले पुरुषसूक्ते,
चांचल्य ह्या मनाचे
जैसे ते चंद्रमाचे……….

समतोल तो मनाचा
राहील स्थिर तेंव्हा,
त्या सर्व वासूकींचे
होईल दमन जेंव्हा………

ईच्छा अनंत साऱ्या
जातीच वासुकींच्या,
करण्या हनन त्यांचे
शिवसंकल्प तो मनाचा……..

त्या शुक्लयजुर्वेदी
शिवसंकल्पसूक्त आहे,
प्रक्षुब्ध चित्त शमण्या
संकल्प शुद्ध पाहे…….

मन देवता तयाची
संकल्प तो करावा,
आयुष्य सार्थकरण्या
शिवसंकल्प तो करावा……..

ईच्छाच इंद्रियांना
प्रवृत्त सदैव करती,
साऱ्याच वासना त्या
उन्मत्त वारू असती……..

मन हिंस्त्र व्याघ्र आहे
त्या इंद्रिया अरण्यी,
फिरतो कुठे कसाही
भक्षास ग्रासन्यासी………

हे सत्य कथन केले
आचार्य शंकरांनी,
विवेकचूडामणी त्या
ग्रंथात शंकराचार्यी……..

मन चित्त शांतकरण्या
ईच्छा नको मनासी,
ईप्सित फक्त ‘श्रेयस’
संकल्प तो मनासी………

मनो मधुकर मेघो
दशचंचला सदाच्या,
करती निबद्ध पुरुषा
आसक्त ‘प्रेयसा’ च्या……..

मनुष्य शरीर रथ हा
इंद्रिय वारू आहे,
करण्या नियंत्रणाला
लगाम मनही आहे………

सर्वास अग्रभागी
नेण्या रथास ऐसा,
सारथ्य बुध्दी करते
आत्मा रथस्थ ऐसा………

हे तत्व अर्थगर्भ
आहे कठोपनिषदी,
शाश्वत सत्य ऐसे
विश्वात सत्य जीवनी……

ते अर्जुना कळाले
चांचल्य हे मनाचे,
अस्थिर, क्षुब्ध उर्जा
चांचल्य वायू सारिखे……….

वेदात सामवेदी
देवांत इंद्र आहे,
इंद्रियांमध्ये मनात
सर्वांभूती चेतनेत……..

प्रिती नसे इंद्रियाची
कर्मामध्ये अनासक्ती,
संकल्प त्यागतो जो
तो योग्य पुरुष जगती………

पतंजली मुनींनी तर
केंव्हाच प्रमेयास सोडविले,
आचार्यांनी तर मार्ग दाखविला
तरीही परंतु फ्रोईड पुन्हा
प्रमेयरूपच झाला…….

विश्वाचा आद्य
मानसशास्त्रद्न्य
पातंजल मुनिच आहे,
सार्या समस्यांचे मूळ
मनामध्येच दडले आहे……..

हे तर केंव्हाच योगशास्त्रात
पतंजलींनी सांगितले आहे,
विस्तृत विवेचन त्याचे
शंकराचार्यांनी केले आहे……..

आम्ही संस्कृत विसरून गेलो
लय पावली संस्कृती,
ज्ञानभांडार विद्येचे
आमचे आम्हीं विसरून गेलो………

विचार करा कांही क्षण
इतरत्र आम्ही शोधतो का,
कारण आमचा आम्हालाच
विसर पडला सगळ्याचा……….


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २१-०७-२०२३ / सकाळी:०४:५० ते ०५:५०
दिनक: २१-०७-२०२३ / रात्री: २३:५९

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top