Marathi

अर्थस्य पुरुषो दास: |[भीष्मपर्व: महाभारत]

पैसे लागतात जगण्याला
मनुष्य म्हणून जगायला,
बुद्धी शरीर शाबूत असले
तरीही पैसे लागतात जगायला……

पण आता कुणी कुठेलच
काम कुणी देत नाही,
लायकी लाख असली तरी
नशिबाची मात्र साथ नाही….

जगण्यासाठी चार घास
तरी पोटाला हवे असतात,
जीवंत तसे राहण्याला
हातपाय हलवावेच लागतात………

बूद्धी अजुन शाबूत आहे
कुठलेही काम करण्याला,
करोनाने जग बदलून गेले
विकासच नको कुणाला……..

पण आता कुणालाच
बूद्धीची गरज नाही,
सर्व करतो संगणक
बुद्धीची कांही गरजच नाही……

जगणे म्हणजे फक्त काय
श्वास घेणे खचित नव्हे,
प्राणी पशु पक्ष्यासारखे
जगणे कांहीं जगणे नव्हे…….

भारतीय घटना म्हणते
आहे अधिकार जगण्याचा,
जगण्याला देखील लागत असतो
आधार तो पैशाचा…….

कसे जगावे माणसासारखे?
भीक मागता येत नाही,
लाज वाटते स्वतःचीच
आयुष्यात कांहीच केल नाही?

हो, मी मिळविल्या जरी
पांच पांच पदव्या पदरी,
त्याचीच आज वाटते लाज,
किंमत शून्य त्याची खरी…….

माणसासारखे जगण्यासाठी
निरूपयोगी पदव्या आज,
एक नवा पैसा देखील
नाही देत कुणी त्या
पदव्यांना आज….

ज्ञान सगळे आणि अनुभव
आता शून्य झाले आहे,
जगण्याचा मूलमंत्र सारे
विसरून विरुन गेले आहे……

मित्र होते जुने कांही
कुठे आहेत माहित नाही,
माझे ज्यांना म्हणतो मी
ते ही आता जवळ नाही…….

जगण्यासाठी कारणे खुप
आहेत हो माझ्यापाशी,
पण मानव म्हणून जगण्यासाठी
पैसे नाहीत माझ्यापाशी……

मागू कसे पैसे कूणापाशी
लाज वाटे माझी मला,
तोंडमिळवणी खर्चाची
कशी करु सांगा मला……

कळते हो सारे मला
नैराश्य खूप वाईट असते,
आत्महत्या करणे हे तर
खुप मोठे पाप असते……

अंधारलेल्या माझ्या जीवाला
प्रकाश कुणी देईल कां?
तत्वज्ञान नको मला
पैसे कुणी देईल कां?

भिक मागता येत नाही
पैसे आणू कुठून कसे,
घेतलेला तिचा हातात हात
सोडुन तिला जाउ कसे?

काळ्याकुट्ट ढगांची
खूप गर्दी झाली आहे,
प्रकाशाची सारी किरणे
लूप्त आता झाली आहे……

आशा तरी कशी करू
आणि करु तरी कशाची,
पराधीन आहे जगती
हेच विदारक सत्य आहे……

जगायचे तरी कसे आता
पशुसारखे जगणे नव्हे,
माणसासारखे जगण्याला
पैशाचे सामर्थ्य हवे……..

पाउस असा पैशाचा कधी
कधीही तो पडत नसतो,
संचिताचा साठा देखिल
आयूष्यभर पूर्ण नसतो……

अपंग नाही खरे असले
तरी पैसे आता मिळत नाहीत,
वाटत होते बुद्धी आहे,
पैशाला काही किंमत नाही….

तत्वज्ञान बुद्धिमत्ता
महान आहे पण तथ्य नाही,
चार घास पोटाला
मिळतील कसे माहीत नाही……..

छत्र आता नाही पित्याचे
आईचा प्रेमळ हात नाही,
गुदमारणाऱ्या माझ्या जीवाला
आता कसलाच आधार नाही……

मुले आता मोठी झाली
त्यांना देऊ शकत नाही,
त्यांना तरी सांगू कसे
फक्त ओझे जगणे आहे………

जीव होतो कासावीस
डोळ्यात पाणी थांबत नाही,
हुंदका महत प्रयासाने
दाबून देखील दबत नाही…….

सांगू कुणाला वेदना माझी
सगळेच तर लहान आहे,
दु:ख त्यांना तरी देऊ कसे
जीवापाड प्रेम आहे……..

© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २१ आगष्ट २०२३
वेळ: सायंकाळी १९:३६

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top