सावळ्या नभातुनी
जलधारा बरसती,
कड्याकड्यातुनी अशा
शुभ्र धारा बरसती……
उंच शिखरी गिरीवरी
उभा असे मनुष्य तो,
अभिषेक त्यांच्या शिरी
करीतसे मेघ तो…….
हरीत वृक्ष बहरले
प्रपात शुभ्र धावती,
पाहता नृत्य तसे
मनात मोर नाचती……
शुभ्र नभापलीकडे
कृष्ण जलद विखुरले,
दुर्ग उंच ठाकला
धरती सौख्य पसरले……
वलयांकित दुर्ग कसा
हरीत वृक्ष चहुकडे,
नभात दाटले कभीन्न
कृष्ण जलद चहुकडे……
मनात सावळा हरी
सावळी नभी आभा,
सावळी तनु धरा
आगळीच ही प्रभा…….
वाटते प्रसन्न मुक्त
भावविश्व बहरले,
सावळाच कृष्ण सखा
मन कृष्ण रंगी रंगले…….
राधेचा कृष्ण सखा
राधेत लुप्त जाहला,
जलात तो अन् प्रपाती
प्रकाश रुप जाहला…….
इथे तिथे नभातही
जलदात वृक्षी सभोवती,
रूप सगुण कणाकणात
बाह्यांतरी श्रीहरी…….
©मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: ३० सप्टेंबर २०२३
वेळ: दुपार १४:३१