पाहता नभात मी, हरी तिथे गवसला,
पाहता मनातही, तिथेही तो असे उभा……..
सागरात जलात मी, केशवास पाहीले,
गिरीशिरी वनांतरी, केशवास पाहीले……..
निर्झरी किरणातही, रक्तवर्ण रश्मिही,
रुप तुझे विलग नसे, अंतरी हरी हरी……
पर्णपुष्प वृक्ष वल्ली, विविधतेत रुप असे
अंतरात अवकाशी, तूच तू सारीकडे……..
शब्दरुप भावरुप, काव्यमर्म तू असे,
शब्दब्रम्ह रुप तुझे, वर्णू मी हरी कसे…….
वेदग्रंथ उपनिषदी, स्मृतीत तूच सापडे,
संगीतात मंत्र-सुक्ती, हरी असे चोहीकडे……..
मीच तो, तोची मी, नसे विभिन्न कांहीही,
मम अंतरी असा इथे, हरीविना न कांहीही………
कशास शास्त्र व्रते आता, वेगळी पूजा दूजी,
अद्वैत ह्रदयी जाहले, मूर्ती का आता दूजी……..
धन्य विभूतीयोग तो, सहस्त्र लक्ष विभूती त्या,
मनास भावते स्वरुप, हरी मनी रुपात त्या……..
हरी कृपा जाहली, अक्षरे उमटली,
असे असा मुमुक्षु मी, प्रार्थना हरीपदी
© मुकुंद भालेराव
फोंडा, गोयें
१७ आक्टोबर २०२३
अपरान्हकाळ: १५:४५ – १८:०१