Marathi My Poems

अमृत दान

कैसा तू करंटा, मारतोस लाथा,
न कळे तुजला, आपले हित………………. ||१||

दिला तुझ्या हाती, जरी प्रकाश दीप,
परि तुला न गवसे, भाग्य तुझे……………. ||२||

आपुल्याच हाती, भाग्याचा तो मार्ग,
मुक्तीचा तो मंत्र, नाकारतो तू…………….. ||३||

साक्षात जरी हरी, ठाकला समोर,
तरी त्यांसी ओळख, मागशी तू ? ………..||४||

भाग्याची रेखा, दिली हातामध्ये,
म्हणतसे हे असत्य, सारे असे ? …………..||५||

चतुर्भुज हरी, जरी तुझ्या दारी,
पाठविशी माघारी, करंटाच रे……………… ||६||

काय करे हरी, अभाग्यासी गाठ,
न ओळखे भाग्य, दारी उभे जरी………………… ||७||

शांत चित्ते मनी, हरीचे स्मरण,
चारी मुक्ति, सहज लाभतसे………………… ||८||

कशाला उगीच, नसती उठाठेव,
शस्त्रांचा धांडोळा, व्यर्थ पुन्हा पुन्हा………………. ||९||

पायावरी त्याच्या, ठेऊन मस्तका,
माग तू मागणे, विश्वासाने…………………….. ||१०||

शीतल त्याचे मन, दयेचा सागर,
देई तुझ सहज, अमृत दान………………….. ||११||


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १२-१२-२०२२

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top