Marathi My Poems

सगळे ईथे गपगुमान

डोंगरामध्ये गाव आहे
अन गावामध्ये डोंगर,
झाडांमध्ये घरे आणि
घरामागे झाडी………..

हिरव्या हिरव्या झाडामध्ये
छोटी छोटी घरे,
छोट्या छोट्या घरामागे
हिरवी हिरवी झाडे………..

वरती खाली खाली वरती
पळतात सारे रस्ते मस्त ,
वाटते लोळावे त्यावर
घसरगुंडी सारखे मस्त …………..

सगळे ईथे गपगुमान
आपल्या आपल्या विश्वात,
मग्न सारे दिसतात सारे
आपल्या आपल्या तालात……….

कांही दुचाकी चतुश्चाकी
फिरत मात्र असतात,
रिक्षा मात्र दिसत नाही
सरकारी बस नाही शहरात………….

दिसले नाही मला कुठे
पुस्तकाचे एकही दुकान,
काय बरे करत असतील
शोधण्यासाठी समाधान ……….

प्रवासी येतात खूप येथे
फेनी त्यांना आवडत असेल,
पण दररोजच्या जगण्यासाठी
काय बरे करत असतील………….

खूप आहेत समुद्र किनारे
जिकडे तिकडे पसरलेले,
परंतु सारे रोज रोज
जात थोडीच असतील तेथे……….

काय बरे करत असतील
गोंधळलेला प्रश्न मनात,
विचारावे कसे कुणाला
हा ही प्रश्न पुन्हा मनात……….

कोडे कांही सुटत नाही
भूमितीचे प्रमेय कठीण,
हवामान करत असेल का
आयुष्य यांचे असे कठीण……….

मला असे वाटते पण
त्यांना काय वाटत असेल,
असेच त्यांना आयुष्य तर
खूप सुंदर वाटत नसेल ………..

कशाला उगाच कंदीलाची
वात आणि तेल जाळायचे,
घेणे देणे कांहीच नाही,
उगाच आपला कंदील लावायचा……..

त्यांचे ते बघून घेतील
आपण शांत राहून घ्यावे,
आपल्याले हवे ते करून
गोवा चांगले पाहून घ्यावे…………….


© मुकुंद भालेराव
फोंडा – गोंये
दिनांक: ०३-११-२०२३ / वेळ: दुपार: १७:५१
दिनांक: ०४-११-२०२३ / वेळ: ००:१४

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top