उंच हिमावरी तिथे
चांगला स्थळ असे,
शुभ्रधवलगिरिवरी
सैन्य तळ तिथे असे………..
सप्तदशसप्तशत फूट
ते तिथे असे वसे,
शुभ्रधवल वलयांकित
मनोहर ते दिसे………….
लेह असे काश्मिरी
लांब उंच पर्वती,
रक्षण्यास मातृभू
सैन्य निशिदिनी कृती…….
मार्ग तो तसा पुढे
जलाशयास जातसे ,
प्यांगांग त्या जलाशयी
विविध रंगी जल दिसे…………..
क्षणात जलात चमकती
रंग नवे विविध ते,
तृप्त करीत नयन असे
स्वर्गीय भासते ते तिथे………….
सभोवती उभे सशक्त
हिमालय नगाधिराज,
रक्षण्या भरतभूस
निशीदिनी अभेद्य खास…………
मनास शांत वाटते
नीलवर्णी नभ तिथे,
जलात नील नील नभी
मन हर्ष पावते तिथे………
शब्द शांत ते तिथे
मौनव्रती गिरी उभे,
पवन मुक्त वाहतो
ईश मनी प्रगटतो…………
असती वृक्ष ना तिथे
कुसुमे न हासती तिथे,
मनास सुखविण्या परी
शांतता तिथे वसे………………
ध्वनी नसे दुजा तिथे
वायू गान गातसे,
गिरीशिखरी नीलजली
स्वर्गीय सर्व वाटते…….
मनास वाटते तिथे
तपस्थ कां न व्हायचे,
निमिषात अवतरेल हरी
स्वप्न सत्य व्हायचे ………….
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: १७ नोव्हेंबर २०२३
वेळ: संध्याकाळी: १९:२३