चारी दिशांना गिरीवृक्ष सारे,
नभाच्या किनारी प्रदीप्त तारे,
अवचित येती जलधारा अशा,
सुखवीत सार्या माझ्या मना……..
असे भासती नभा मध्ये ते,
कसे प्राणी-पक्षी आकार सारे,
क्षणात येई रविकिरणांचे,
इवले कवडसे फुलाफुलांचे……..
बरसात ऐसी नभामधुनी,
जलाशयाला चुंबून घेती,
रंगबिरंगी जलाशयाला,
सुंदर मोहक क्षणात करती…….
वळला रवी तो असा पश्चिमेला,
स्वये घेउनी सुवर्णरेखा,
नभातूनी मग अवचित ऐसी,
धरे उतरली जणू अप्सरा ………..
असे दिव्य काया नयनात विश्व,
तसे नृत्य तेथे नदीच्या जलात,
तिची भैरवीची बंदिश ऐसी,
भरून उरली माझ्या मनात……….
चित्तामध्ये तो सुकुमार नाद,
तरंगती ते कोमल मनावर,
असे वायुसंगे आले कुठून,
असे चित्र उमटे माझ्या मनावर ………
जलाशयावर कशी चालली ती,
रुगार्विता ती ऐशी परी,
क्षणी एक पाहता कशी जाहली,
ती मत्सकन्या कशी आगळी……………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ८ नोव्हेंबर २०२३
वेळ: सकाळी: ११:२१