बसावे असे ते नदीच्या किनारी
डोळे मिटुनी क्षणकाल कांही,
विचारी मनाला निस्तब्ध ऐसे
वाहत्या नदीच्या प्रवाहा किनारी……….
नदीच्या तळाशी मनाच्या तळाशी
किती खोल आहे विचारी मनाशी,
तिथे साचलेल्या स्मृतींच्या कथा त्या
रंगीबिरंगी वाटे मना त्या……..
किती ते स्मृतींचे अद्भुत राग
श्रवती सुखाचे असे गीतसार
किती चेतना त्या सुखवी मनाला
दुर्दम्य इच्छा अशा जागृतीच्या …….
नदीच्या प्रवाहा जसे खोल खाली
साचून असती स्मृतींचेच कांही ,
पुन्हा त्या किनारी तैसे बसावे
डोळे मिटुनी स्वत:ला बघावे………
तशा त्या क्षणाला पसरून किरणे
प्रवेशो मनाशी किरण भाष्कराचे,
त्या सांध्यसमयी डोळे मिटावे
त्वरेने शशीने उदयास यावे…………
प्रभा शांत पसरो मनाच्या तळाशी
शशीच्याच संगे शांती मनाशी,
ऋचा अमृताच्या तशी वेदसुक्ते
रुजाव्या मनाशी अंतस्थ राशी……….
अग्नि मिळे पुरोहितम् असा नाद व्हावा
अनाहत ध्वनी तो निनादत रहावा,
अशी अमृताची हृदयात ओवी
फुलावी शब्दमाया ती ज्ञानेश्वरी………
विरावे शब्द सारे गजबज शांत व्हावा
ओंकार हृदयी अनाहत बनावा,
स्फुरो गान कांही तशी वेदवाणी
अद्वैत व्हावे अशी दिव्य वाणी………
जाव्या विरुनी भिंती मनाच्या
दिसावे जीवाला निजरूप तुझे ,
लागो जीवाला हरीच्याच आशा
अन मावळो त्या सार्या निराशा………
सहस्त्र तारकांची कुसुमे बनावी
विश्वात्मकाची पूजा मनाशी,
जगी अंश सारे ईशरूप सारे
नसे भिन्न कांही नाही दुजे ते…………..
एकात्म व्हावे नको बंध कांही
प्रभुच्या पदाशी विसरून राही,
नसे मग प्रतीक्षा कुणा भेटण्याची
रिद्धीसिद्धी कशाला हरीच्या पदाशी……..
© मुकुंद भालेराव
पोंडे – गोंये
दिनांक: १५-११-२०२३ / सकाळी : ०९:५७
दिनांक: १६-११-२०२३ / संध्याकाळी: १८:४२
दिनांक: १७-११-२०२३ / सकाळी: ११:०९