तुझ्या स्वरांनी बद्ध केले मनाला
थांबलो एक मात्रा स्वरा ऐकण्याला,
थांबता समेशी अग्रजा सवे मी
झंकारल्या त्या तारा मनाच्या…………..
असा नाद होता स्वरांचेच विश्व
प्रवासा निघाली सप्तकात शांत,
मनी आठवे रुप सरस्वतीचे
जसे भासते माहेश्वरसूत्र ते………
संगीत अमृत स्वर्गीय सारे
फुलवी मनाला आनंद सारे,
तिचे स्वरांचे उन्मेश सारे
ह्रदयात चैतन्य ऐसे उमलते……….
अनुज तालात किती रमविणारा
तालात शब्दात असा बोलणारा,
प्रत्येक मात्रा स्वरांच्या रुपाला
फुलवी मनाला सात्विक भावा……..
आयुष्य संगीत साथीत दंग
भरुनी उरावा स्वरांचा सुगंध,
ह्रदयात तळपो सदा स्नेहदीप
नाते मनाचे असे एकरुप………
सेवा घडावी सुरासप्तकाची
तालासुरांचा जल्लोश व्हावा,
स्वरताज तालात रंगुन जावा
भगिनीस ऐसा सहोदर मिळावा……
© मुकुंद भालेराव
फोंडा – गोंये
दिनांक: १० नोव्हेंबर २०२३, नर्कचतुर्दशी
वेळ: सकाळी: ०८:१०