Marathi My Articles

अभ्यास, गुण टक्केवारी, पर्सेन्टाईल वगैरे

आजच्या काळात ‘पुढे जाणे’ हाच केवळ एक महामंत्र  मुले आठव्या, नवव्या वर्गात पोहचली कि, घराघरात उच्चारणे सुरु होते. त्याच बरोबर जेईई, जेईई अडवांस, बित्स्याट अशा विविध परीक्षांची चर्चा सुरु होते आणि ते सहाजिकच आहे म्हणा. ते  सर्वस्वी चूक आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही, परंतु प्रश्न असा आहे कि, ‘पुढे जाणे” म्हणजें काय हे परिभाषेत होणे महत्वाचे आहे, आवश्यक आहे. या प्रश्नाचा मागोवा आधी तर आईवडीलांनी घेणे आवश्यक आहे. 

अभ्यास करत असतांना मन स्थिर रहात नाही अशी सामान्यत: विद्यार्थ्यांची तक्रार असते. मग अभ्यास होत नाही. चांगले गुण, पर्सेन्टेज (टक्केवारी), पर्सेन्टाइल येत नाही. त्यातून मग निराशा येते व घरच्यांचा खूप दबाव असेल तर मग आत्मघातकी विचार मनात येतात. घरातील वातावरण जर चांगेल, उत्साहवर्धक व प्रोत्साहन देणारे असेल, समजवून घेणारे असेल तर ठीक, नाहीतर मग जे नको व्हायला हवे तेच घडते. मध्यंतरी कोटा (राजस्थान) येथे असे दुर्दैवी प्रकार खूप घडलेत. यावर कांही उपाय आहे कि नाही? निश्चितपणे आहे. आईवडिलांनी सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवे कि, डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणजेच आयुष्य नाही. जगण्याचा तोच एकमेव मार्ग नाही. 

आपण समजात मागच्या शंभर एक वर्षाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल कि, समाजामध्ये नेतृत्व करणारे धुरीण कुणीही डॉक्टर किंवा इंजिनिअर नव्हते. अगदी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी, सगळेच. आत्ताअलीकडच्या काळात भारतरत्न डा. ए. पी. जे. अब्दुल कलामांसारखे हातावरच्या बोटावर मोजता येतील इतके अपवाद आढळतील. बाकीसगळे सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास केलेलेच आहेत. अगदी भारताचे पहिले राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, शिक्षा मंत्री सगळेच. एखादी संस्था चालविणे, कारखाना चालविणे, एखादा विभाग चालविणे या पेक्षा एखादे राज्य चालविणे देश चालविणे हे खचितच महत्वाचे व जिकीरीचे काम आहे व ते करण्याकरिता केंद्रीय किंवा राज्य सेवा आयोगाद्वारे निवड होण्याकरीता कुठेही आवश्यक पात्रता डॉक्टर किंवा इंजिनिअर नाही.

याचा अर्थ असा मुळीच नाही कि, त्या त्या क्षेत्रात संबंधित शिक्षण आवश्यक नाही. शल्यचिकित्सा करावयाची असेल तर डॉक्टरच लागणार, कारखाण्यात यंत्राशी संबंधित काम करावयाचे असेल तर इन्जिनिअरच लागणार वगैरे, परंतु   त्याशिवायही इतर क्षेत्र आहेत काम करायला. जसे सैन्यामध्ये फक्त सीमेवर लढणारे सैनिकच नसतात, तर त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्याकरिता वेगवेगळ्या विषयातील तज्ञ देखिल लागतात.

मला आठवते साधारणत: १९८८-८९ च्या दरम्यान मी एका खाजगी औद्योगिक संस्थेमध्ये काम करत असताना माझे एक सहकारी होते. त्यांची मुलगी १२ वीला होती. परीक्षेचा निकाल लागला व तिला हवे तसे अपेक्षित गुण मिळाले नाही. तिच्याबरोबर शिकणाऱ्या मित्रमैत्रिणीनी तुला आता एमबीबीएसला प्रवेश मिळू शकत नाही मग काय अर्थ आहे आयुष्यात, असे म्हणावयास सुरुवात केली. ती मुलगी खूप निराश झाली आणि ती निराशेच्या खोल गर्तेते जाते कि काय अशी भीती तिच्या घरात निर्माण झाली. तिच्या वडिलांनी मला मुलीशी बोलण्याची विनंती केली. साधारणत: एक दीड तास तिच्याशी बोलल्यानंतर मग कुठे ती जरा विचार करण्यास तयार झाली. त्यानंतर तिने बीडीएस केले. चागंल्या डॉक्टर मुलाशीच लग्न झाले व आज आयुष्य सुख व समाधानाने जगत आहे. समुपदेशन (Counselling) हा एक उपाय नक्की आहे. मी तर म्हणेल कि, आई वडिलांनी स्वत: अभ्यास करून ज्ञानाच्या किती वेगवेगळ्या शाखा उपलब्ध आहेत हे समजून घेऊन त्याबाबत मुलांबरोबर चर्चा करावी.

‘चांद्रयान’ व ‘मिशन मंगळ’ आपण सर्वानीच वाचले, ऐकले व पाहीले सुद्धा आहे. इस्रो (Indian Space Research Organization) ची स्वत:ची प्रशिक्षण व्यवस्था आहे, परंतु तिथे नंतर मिळणारा पगार खाजगी संस्थामध्ये मिळणार्या पगारापेक्षा कमी असल्यामुळे तिकडे हुशार मुले जात नाहीत हे स्वत: इस्रोचे अध्यक्ष श्री. श्रीधर सोमनाथ यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले. किती दुर्दैवाची गोष्ट आहे !       

पैसे असायला हवेत पण किती? किती पैसे लागतात चांगले जगायला? याचे उत्तर हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे. या संदर्भात ९० च्या दशकातील अमिताभ बच्चनचा एक गाजलेला चित्रपट आठवतो ‘अग्निपथ’, ज्यामध्ये त्याचे नाव विजय दिनानाथ चव्हाण असते. त्याच्या आईची भूमिका श्रीमती रोहिणी हत्तंगडी यांनी केलेली होती. माझ्या स्मरणशक्तीनुसार बहुधा त्यात दिवंगत विक्रम गोखले यांनी पोलीस कमिशनरची भूमिका केलेली होती. ते रोहिणी हटन्गडीला भेटायला जातात तेंव्हा ती म्हणते,”त्याला सांगा कि मी अजूनही लोकांचे कपडे शिवून जगते कमी पैशात”. विजय चव्हाण त्यात गुंडाची भूमिका करत असतो, अर्थातच खूप पैसे असतात त्याच्याजवळ. जगात दोघेही जगत असतात, पण दोघांच्या पैशाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, कारण विचार वेगवेगळे असतात.

अमुक खेळाडूकडे किंवा चित्रपट अभिनेत्याकडे ४-५ कार्स आहेत, आणखी दुसर्या कलाकाराकडे स्वत:चे विमान आहे वगैरे. असेल असे, पण याचबरोबर देशात व समाजात इतरही खूप लोक आहेत, जे महिन्याला फारतर पाच सहा हजारात जगतात. जगण्याला पैसा लागतो हे जरी खरे असले तरीही फक्त पैशाने जगता येत नाही. इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण आहे, Man cannot live by bread alone. अन्न, वस्त्र  आणि निवारा ह्या तर प्राथमिक गरजा आहेत. त्यापलीकडे आरोग्य, शिक्षण  वगैरे गरजा असतातच. कुणीही हे सत्य नाकारत नाही.

महाभारत युद्धाच्या वेळी युद्ध सुरु होण्यापूर्वी, युधिष्टिर (धर्मराज) पितामह भीष्मांचे आशीर्वाद घेण्याकरिता जातात व नमस्कार कारतात, तेंव्हा पितामह युधिष्टिराला “यशस्वी भव!” असा आशीर्वाद देतात व सांगतात कि, “आम्ही धर्माच्या बाजूने नाहीत, कारण ‘अर्थस्य पुरुषो दास:!’ आम्हीं दुर्योधनाच्या पैशाने बांधलेले आहोत. इथे मुद्दा हा नाही कि, त्यांनी बरोबर केले कि चूक केले. तो वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो. महत्वाचा मुद्दा असा आहे कि, पैशापेक्षा जगात अजून खूप गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सुख, समाधान व आनंद देऊ शकतात. मी यावर एक स्वतंत्र लिखाण पूर्वी केलेले आहे कि ‘आनंद कशात आहे.’

असो. मुलांच्या मनावर हे बिंबवायला हवे कि पैशाच्या पलीकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचे जीवन आनंदी करू शकतात.

मध्यमवर्गीय घरातली मुले चांगले गुण मिळवतात, अमेरिकेत जातात एम एस करतात. मग घेतलेले कर्ज फेडण्याकरिता तिथेच नोकरी करायला सुरुवात करतात. कौतुकाने आईवडील मग अमेरीकावारी करून येतात. आल्यावर अगदी खूप वेळापासून तिकडेच रहात आहोत अशा थाटात वाशिंगटन, न्युयार्क, स्यान्फ्रान्सिस्को, डेत्रोईट इत्यादी नावे अभिमानाने व सहजपणे उच्चारू लागतात आणि आपल्याला उगाचच आपण बावळट असल्यासारखे वाटायला लागते. सगळीकडे कौतुकाने सांगतात कि, मुलाने कशी गाडी व घर घेतले तिथे, कसे नायगारा  फोल्सला घेऊन गेला, तो धबधबा कसा अमेरिकेच्या बाजूने सुंदर दिसतो वगैरे. दरम्यान मुलाचे लग्न होते व तो सहकुटुंब तिकडे राहायला सुरुवात करतो. अजून तरी महाराष्ट्रातील मुले भारतीय मुलीशी लग्न करतात असे दिसते. अजून तरी तिकडे शिकत असलेल्या किंवा बरोबर शिकलेल्या, पण भारतीय मुलीशी करतात लग्न.

एव्हाना कर्ज फिटत आलेले असते शिक्षणाचे; परंतु तिथे राहण्याकरीता अनेक आवश्यक वस्तू खरेदी केल्यामुळे ते कर्ज फेडणे सुरु होते. मग मुलाला वाटते कि, आपल्या मुलाचा जन्म तिथे झाला तर आपोआप त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळून जाईल. मग थांबूया थोडे. त्यावेळेपर्यंत पगार खूप वाढलेला असतो, सुखसोयींची सवय होऊन बसलेली असते किंवा त्या सुखसोई व तितका पगार भारतात मिळणे शक्य नसते. नवीन ओळखी व संबंध तयार झालेले असतात व भारतातले संबंध व नाते विस्मरणात तरी गेले असते किंवा विरळ झालेलं असते. पूर्वी सारखी ओढ त्या नात्यांमध्ये राहिलेली नसते. एव्हाना मुले जर मोठी झालेली असली तर त्यांना अमेरिकेची सवय लहानपणापासून झालेली असल्यामुळे अजूनच कठीण होऊन बसते. मुलांचीच ओढ कमी झाली तर मग त्यांच्या मुलाची गोष्ट काय! झाले मग काय तो तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतो. संपले! फक्त डॉलर पाठवत राहतो.

या ठिकाणी एक नमूद करावेसे वाटते कि, जर पैशानेच सुख मिळत असते, आनंद मिळत असता तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री माधुरी दिक्षित तिच्या आवडीप्रमाणे अमेरिकन डा नेनेशी लग्न केल्यावर भारतात का परतली असती? तिच्याकडे पैसे तर खूप आहेत. स्वत:चे विमान आहे, अमेरिकेत घर आहे. पती प्रसिद्ध डॉक्टर आहे. मला वाटते कि, तिथे माधुरी दिक्षितला ओळखणारे, तिचे कौतुक करणारे, तिला सन्मान देणारे नसावे. अमेरिकत हिंदी चित्रपट पाहणारे अमेरिकन व भारतीय किती? शिवाय तिचे कौतुक करायला कुणाकडे वेळ आहे. So, what she might be missing was the Recognition and Self-Actualization, which money is unable to buy for her, because it is intrinsic. Money may help but cannot guarantee the satisfaction at all. After working for many years in Indian Film industry, getting lot of money, recognition, fame and status as a successful performer, it has become her ‘essential for life’. That illumination, light of publicity and fame was all she must be missing in USA.    

मुलांनी अपयश पदरी पडल्यामुळे आत्महत्या कारणे किंवा परदेशात जाऊन स्थाईक होणे आईवडिलांच्या दृशिकोणातून जवळपास सारखेच! परदेशात वास्तव्य त्यातल्या त्यात बरे कि, कमीत कमी असे वाटत असते कि, आहे तो तिथे दूर का होईना, इतकेच समाधान मानून जगायचे. आईवडील भारत सोडून जाऊ इच्छित नसतात व मुलं इकडे येऊ इच्छित नसतात. मग वर्षातून एकदा केंव्हातरी १५-२० दिवसांकरिता येतात. त्यातील अर्धे दिवस पत्नीच्या माहेरी भेटायला (सहाजिकच आहे.) कांही दिवस इकडे तिकडे फिरायला व जेमतेम ५-६ दिवस आईवडीलांबरोबर. इतकेच! संपले! पुन्हा मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे पुन्हा केंव्हा येईल हा विचार करत.

महर्षी पतंजलींच्या योगसुत्रात, ‘अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध:|’ मनाचा निरोध अभ्यासाने (अतिरिक्त हव्यास न बाळगता.) करता येतो आणि का करायचा निरोध, तर ‘योग: चित्त वृत्ती निरोध:|’  [पातंजल योगसूत्र: १.१२] मनाच्या चंचलतेला आवर घालणे म्हणजेच योग आहे.

मन जर अभ्यासाकडे वळविले, तर कांही एका वेळाने ते स्थिर होईल; कारण कि, या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही कि, ते (मनाला एकदा कां एखाद्या गोष्टीची गोडी लागली कि) अनुभवलेल्या गोडीच्या (अनुभवसुखचि) ठिकाणी थांबते, रेंगाळते, स्थिर होऊ इच्छिते, (The wavering mind takes a pause, lingers and get stuck up at the place where it gets pleasure, which it likes and desires to have.

मतितार्थ असा कि, कुठल्याही गोष्टीची अवाजवी हाव (Excessive Greed), अनियंत्रीत इच्छा (Uncontrolled Desire), हापापलेपणा, हव्यास (Maniac attitude) म्हणजे ‘विषय’. खरे तर याला आधुनिक मानसशास्त्रात Obsessive Compulsive Disorder (OCD) असे म्हणतात. ही चांगली मानसिक अवस्था नाही. तो एक मानसिक रोग समजला जातो, ज्याचे द्योतक आहे.

आजच्या काळातील ‘उपभोक्तावाद’ (Consumerism). जास्तीत जास्ती तयार करा व कसेही करून विका, लोकांच्या माथी मारा. लोकही आवश्यकतेपेक्षा खूप जास्त वस्तु विकत घेतात, कांही जण तर केवळ नवीन आहे म्हणून व कांही जण दुसऱ्या जवळ आहे म्हणून, म्हणजे काय दुसर्याशी तुलना! अशा प्रकारे तर आपण कधीच सुखी होऊ शकणार नाही, कारण कुणीतरी आपल्यापेक्षा कशात तरी जास्ती पुढे, सरस असणारच.

मागे एकदा कुठल्याशा दूरदर्शन वाहिनीवर जगप्रसिद्ध क्रिकेटपटू श्री. महेंद्रसिंग धोनी याच्या घरी किती स्वयंचलित दुचाकी आहेत हे दाखवत होते. जवळपास शंभर एक तरी असाव्यात. गरज असेल का इतक्या दुचाकींची? नक्कीच नाही, मग का घेतल्या असतील? पैसे खूप आहेत त्याचे काय करायचे हाच प्रश्न असावा. हाच उपभोक्तावाद. एका मुलाखतीत जगप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न श्री. सचिन तेंडूलकर याने असे सांगितली कि, खरे तर वस्तूची किमत किती तर आपण त्या वस्तूच जितका उपभोग घेउ शकत असू तितकी. The value of a thing is determined depending upon our ability to use and enjoy that thing, whether it is house, car or for that matter any non-living thing. आपण मुद्दा समजण्याकरिता एक उदाहरण घेऊ. समजा एखादा खेळाडू किंवा सिने कलाकार आहे व तो वर्षातील दहा महिने घरापासून सतत दूर असतो. त्याच्या घरी फेरारी, ल्याम्बोर्गिनी, मर्सिडीज कार्स आहेत, घरात स्विमिंग पूल आहे, ब्याडमिन्टन कोर्ट आहे व मिनी थियेटर पण आहे. आता मला सांगा कि, या सर्व गोष्टींचा उपभोग घेण्याकरिता जर त्याच्या जवळ वेळच नसेल तर त्या गोष्टींची उपयोगिता (Utility)  किती त्याच्याकरीता. माझ्या मते शून्य!   

आधुनिक अर्थशास्त्राचा जन्मच मुळात मर्यादित साधनसंपत्ती व अमर्याद इच्छा यांचा मेळ घालण्याकरिता झालेला आहे. Economics is a science to fulfil unlimited demands (desires) with limited resources. हे माहित असूनही सर्वजण अर्थशास्त्रातला अजून एक नियम विसरतात सोयीस्करपणे. तो नियम आहे ‘आर्हासी उपयोगिता नियम’ (Law of Diminishing Utility). कुठल्याही गोष्टीचा उपभोग घ्यायला सुरुवात केल्यानंतर क्रमाक्रमाने हळूहळू त्या उपभोग्य वस्तूची गोडी (उपयोगिता) कमी कमी होत जाते. जसे आपण जेवायला बसलो आहे आणि आपल्याला एक पुरणाची पोळी वाढली ताटात. आपण तिचा आस्वाद घेतला. मग यजमानांनी दुसरी वाढली, मग तिसरी वाढली….बस्स, आता नको, जात नाही. का बरे म्हणतो आपण असे? कारण आपल्याला माहित असते कि,

अतिरुपेण वै सीता, अतिगर्वैण रावण: |

अतिदानं  बलिर्दत्वा अति सर्वत्र वर्जयेत्  ||१२||

(चाणक्य नीति अध्याय – ३, श्लोक-१२)

कळत सगळ असते पण वळत नाही नं ! हीच तर समस्या आहे खरी ! माहित आहे कि इतका अतिरेकी हव्यास आपल्याला भलतीकडेच घेऊन जाईल आणि तरीही, खरे तर आतून आवाज येत असतांना देखिल आपण थांबतच नाही. आतला आवाज ऐकतच नाही, कारण वरकरणी तो आपल्या सोयीचा नसतो त्यावेळी. यासंबंधात मला एक उर्दू शेर आठवला, ‘जब दवा हदसे गुजर जाती है, तो दर्द बन जाती है|’  

थोडक्यात काय, तर आपल्या इच्छा शक्य तितक्या मर्यादित ठेवाव्यात. ‘युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु |’ (भगवदगीता: अध्याय-६, श्लोक-१७)

आपण कितीही कष्ट केले तरीही शेवटी दैवाचा थोडासा भाग असतोच. माल्कम ग्ल्याडवेल याने त्याच्या ‘आउटलायर्स’ ह्या बेस्ट सेलिंग जगप्रसिद्ध पुस्तकात याविषयी अनेक उदाहरणे दिलेली आहीत. आपण तर केवळ ज्ञान मिळवीत आहोत. आपण आपले काम करू, पूर्णत्वास जाईल अथवा नाही याचा विचारच नाही करायचा. श्रीकृष्णाने तर समस्त मानव जातीकरीता एक प्रगटन (Declaration) केलेले आहे कि, ‘मी मनुष्याच्या मनात वास करतो’. मग आपण कशाला चिंता करायची. परमेश्वराने तर हमीच (Guarantee) दिलेली आहे ना.   

अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना: पर्युपासते |

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || भ.गी.अ.९.२२||

जो माझे खर्या अंत:कारणाने स्मरण करतो त्याची काळजी मी करतो. अर्थात पुन्हा इथे हे नमूद करावेसे वाटते कि, आईवडिलांनी मुलांना दररोज नित्यनेमाणे परमेश्वराचे स्मरण करायला सांगितले पाहिजे, प्रयत्न  तर हवेतच.  

नियतं कुरु कर्म त्वं कर्मं ज्यायो ह्यकर्मण: |

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण : ||भगव्द्गीता ||आधाय:३, श्लोक८||

तू तुझे ठरलेले काम कर. मग ते अभ्यासशी निगडीत असेल, घराशी निगडीत असेल, समाजाशी निगडीत असेल, देशाशी निगडीत असेल किंवा आईवदिलांनी सांगितलेले असेल व इतर कुणी मोठ्या लोकांनी सांगितलेले असेल; कारण कांहीच न करण्यापेक्षा आपले ठरलेले काम करणे केंव्हाही श्रेष्ठ व महत्वाचे असते. आपल्याला जिवंत राहण्याकरिता देखिल कांही गोष्टी कराव्याच लागतात नां.


© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ९ डिसेम्बर २०२३ / वेळ: सायंकाळी: २०:२०

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top