उत्तरेतल्या हिमसाक्षीने
गंगा यमुना नदी तिरावरी,
सुबक असे ते ग्राम आगळे
रुरकी ते तर शांत निराळे……
परिसर त्याचा नयन मनोहर
विशाल सुंदर वृक्ष सरोवर,
रेखीव ऐसा पदपथ तेथे
निवास तेथे किती मनोहर…….
विद्यार्जन ते करण्यासाठी
घरा सोडुनी दूर प्रदेशी,
ऋषी कुलासम भव्य वनाशी
निवास जयचा त्या ग्रामाशी…….
पंच मास तो शिक्षा घेऊनी
अवकाशाला प्राप्त करुनी,
गृहे परतला आनंदाने
पुन्हा भेटण्या तो सर्वांशी…….
मनी आनंदें अग्नीरथाने
प्रवास केला मित्र साथीने,
ह्रदयामध्ये ओढ घेउनी
अवकाशाच्या आनंदाने……….
ध्येय असे ते खडतर मोठे
अभ्यासाचे डोंगर तेथे,
अहोरात्र ते अभ्यासाने
खचित मिळवील मान तिथे………
इप्सित होते मनी मानसी
दृढ संकल्पाचा धनी असे,
सहस्त्र करती यत्न तरीही
भाग्यवान त्या केवळ मिळते………
यश किर्तीच्या कठीण पथावर
एक लक्ष ते मनी बांधुनी,
यश सूर्याच्या ऊर्ध्व पथावर
जय जयकाराचा दिव्य ध्वनी…………
अहर्निश ते प्रयत्न करुनी
ध्येय निष्ठा दृढ करुनी,
प्राप्त तुला हो यश किर्ती बल
हीच कामना सर्व मनी…………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: २ डिसेंबर २०२३
वेळ: सकाळी: ०८:२८