Marathi My Poems

वसंत फुलव राजसा

तुझ्याविना मला सख्या
वाटते उणे उणे,
तूच सांग रे मला
काय मी करू कसे………..

तूच ओढ लाविली
प्रीत फुलविली अशी,
क्षणात विसरू हे कसे
तूच सांग मज सखी……….

कधी न वाटले मला
फुलेल प्रीत ही अशी,
आताच यमन गायला
आताच थांबू रे कशी………

विलंबित शांत चित्त
चंद्रकंस ख्याल ही,
आलाप आर्त आळविता
स्मरण तुझेच अंतरी……….

मध्यरात्र शांत मधुर
स्वरास्वरात तूच तू,
आळविता आर्त शब्द
नयन मनी तूच तू…………..

आता न विसर व्हायचा
कशास विसरणे तसे,
सर्व सप्तकांमध्ये
गीत फक्त आपुले………..

रम्य त्या स्वरातली
आर्जवी आळवणी,
चित्त मनी हृदयात तू
जीवन श्वास तूच तू………..

जाऊ नको दूर तू
जवळी रहा इथे असा,
स्वरात ताल मिसळूनी
वसंत फुलव राजसा……….

अभिन्न हृदय जाहले
अंतरात मिसळला,
मधुर मुक्त गंधही
पसरला मम मना………..


© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: ३० नोव्हेंबर २०२३
वेळ: रात्री : २३:३८

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top