कार्तिकी कृष्ण त्रयोदशी,
माध्यानीचे काळी,
आळंदी ग्रामी झाली मांदियाळी
संतांची……
.
युगाचा भास्कर,
अस्तासी जाण्याचा
उगवला तो दिवस,
त्रयोदशी……..
इंद्रायणी मातेला,
करुनी नमन
केले स्नान सचैल,
ज्ञानदेवे……….
तुलशीहार गळा,
कपाळी तो गंध
झाले ज्ञानदेव,
सिद्ध आता………
घेउनी मग दर्शन,
तैसे सिद्धेश्वराचे
वंदिले तेणे चरण ,
गुरु निवृत्तीनाथा………
वायुमंडल निस्तब्ध,
थांबला गभस्ती,
सोपान मुक्ताबाई,
फोडती टाहो……….
ज्ञानदेवे तेंव्हा,
ठेविले मस्तक
करती नमन नामदेवा,
अनन्यभावे ………..
भागवतधर्म पताका,
नामा तुज नेणे
स्थापीने तुज त्यासी,
गगनासी……….
नामदेव तैसा,
जाहला चरणी लीन
वाहती अश्रू अनावर,
ज्ञानापायी……….
आळंदीस नमून,
करुनी संतांसी वंदन
शांत मग ज्ञाना,
गेला समाधीस्थळी………
मुखी नाम विठ्ठल,
मिटले ते डोळे
प्राणायाम निरोधिला श्वास,
योगमार्गे……..
निवृत्तीनाथ मग,
कष्टी अंत:करणे
ठेविली ती शिळा,
समाधी मुखे………
अनंतात विरला,
आत्म ज्ञानदेव
ब्रह्मपदी ऐसा,
लीन झाला…….
स्मरता अनन्यभावे,
ब्रम्हरूप माउली
कृपा योगेशाची,
पावे आम्हा……….
सप्तविंशत अधिक
सप्तशतके संजीवन
समाधी सुख शांती चित्ता,
अखंड देई………..
अभ्यासावी ज्ञानेश्वरी,
एकाग्र चित्ते
करावे स्मरण,
ज्ञानेशाचे………
पावेल खचित,
ज्ञानेश्वर माउली
करेल वर्षांव,
स्नेह माया………..
न धरावा मनी,
किंतु कुणी ऐसा
अनन्यभावे अर्पावे,
चरणी तया……..
वेदांचे ज्ञान,
उपनिषद सारही
गीता कथिली आम्हा,
ज्ञानेश्वरी……..
केला प्रपंच मोठा,
स्वयं ज्ञानदेवे
करण्या ज्ञानवंत,
सकळ जना………
ज्ञानाचा सागरू,
भक्तीचा अवकाशु
भक्तीमार्ग सोपानु,
दिधला आम्हा……….
काय शिणवावी,
वाचा आता आम्ही
चालतो तुझ्या मार्गे,
ज्ञानदेवा………
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
शके १९४५, कार्तिक कृष्ण त्रयोदशी
सोमवार, दिनांक: ११ डिसेम्बर २०२३
दुपार: १३:२४