वाटले पुन्हा पुन्हा
जायचे हिमगिरी,
हिमस्पर्श मधुर असा
हर्ष तोच मानसी………….
दूर हिमाचली तिथे
प्रसन्न चित्त व्हावया,
विसरण्या नित्य नव्या
अनंत त्या विवंचना………..
खचित योगी मी नसे
संत वा महंतही,
क्षणात जावया तिथे
योगमार्गी मी नसे………
विदेह रूपी व्हावयास
पुण्यकर्म खूप ते,
मिळविले नसे असे
अरूप व्हावयास ते…………
जाणतो मी तरीही
असे कदा न व्हायचे,
क्षणात अरूप होऊनी
दूरस्थ गमन व्हायचे………….
मनास वेग वायूचा
निमिषात विचरतो असा,
सप्त पाताळात तसा
अंतरीक्षी विहरी असा……….
असे मनाने जायचे
हिमरूप ते बघायचे,
कल्पनेत स्पर्शही
मन आनंदी व्हायचे……………..
विज्ञान तंत्र मंत्र तो
मिळो मला सुलभ तो,
निमिषात एक तत्क्षणी
झडकरी मनोमनी…………
मनी सुरम्य निसर्गचित्र
अवकाश मार्ग जायचे,
स्पर्शगंध रंग मधुर
अनुभवूनी यायचे………..
© मुकुंद भालेराव
पोंडा – गोंये
दिनांक: १ डिसेंबर २०२३
वेळ: सकाळी: १०:०१