अचेतन मनांत आंत
भिती असे मनांत फार,
विध्वंसक युद्ध सुरु असे
उन्मत्त विचार अनंत आंत………
अवास्तव वासना किती
प्रबळ मनांत ही तिथे,
हैदोस रात्रंदिन तयांचा
विक्राळ असे रूप दिसे………
अनैतिक वासनांचेच ते
प्रचंड तांडव ही तिथे,
अवास्तव इच्छांचे अपार
अफाट प्रेमही तिथे………
स्वार्थी गरजांचे अमाप
थैमान अथक चालते,
निर्लज्ज अनुभवांचे
कृष्णकृत्य ही तिथे……..
मदांध असे अचेत विश्व
अर्धचेत तयावरी,
संचित ज्ञान स्थिर तिथे
स्मृति अनंत बरोबरी…….
शिर्षस्थानी विचार विश्व
संकल्पना सचेत त्या
सदा प्रयत्नशील तसे
नियंत्रणार्थ नित्य मना………
एक सप्तमांश असा
हिमनगा सदृश तसा,
दिसतसे बाह्य जगा
मनाचा विस्तार हा…….
मनाचा थांग कधी
लागेल कुणा तो कसा,
अभेद्य ही दुर्ग जसा
भेदण्यास कठीण तसा……
मनातले अनंत विश्व
पार त्याचा ना लागतो,
परमाणु शक्तीशाली
शक्तीपुरुष वाटतो……..
© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: १६ एप्रिल २०२४
वेळ: सायंकाळ: १७:३५
स्फुर्तीस्थान: सिग्मंड फॉईड,
न्युरॉलॉजिस्ट,
६-०५-१८५६–२३-०९- १९३९,
(ऑस्ट्रिया – इंग्लंड)
Also read: Mind’s Architecture कादिर-ए-मुतलक