हातात हात घेता
जुळली मने क्षणांत,
गुंफून त्या करांना
मी घेतले हातात……
शास्त्रार्थ सत्य असतो
रूढी परंपराही,
अवचित गवसतो तो
मग अर्थ जो प्रवाही….
विवाह बंधनाचा ऋतु
अर्थ सत्य वाही,
संस्कार जीवनाचा
करतो तसा प्रवाही….
मांगल्य त्या ऋतूंचे
तो सोहळा जनांचा
करतो प्रगट ईशाचा
संकल्प तो तयाचा….
ती शास्त्र-सूक्त वचने
ऋचा तशा समर्थ
ते अर्थगर्भ सूक्ती
फुलवित ते मनास….
ते स्पर्श अधीर सारे
नि:शब्द बोलती जे,
मंत्रात भारलेले
तो अर्थ ही निराळे….
अग्नि समोर वचने
करी घेउनी करास
स्मृति युगायुगांच्या
स्मरल्या पुन्हा मनांत….
हा चार दशकांचा
नसे काल हा लहान,
आहेत अनंत साऱ्या
सारी मधुर साठवण….
मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २६ जून २०२४
वेळ: १०:४५ – १५:२९