निळ्या नभा पसरले
हे श्वेत अभ्र सारे,
हिरव्या धरेवरी ते
हे गालीचे तृणाचे…….
त्या सानुल्या घरात
किती रम्य लोक असती,
जगणे किती निराळे
किती भाग्यवान असती……
वन बाजुला चहूकडे
मैत्री जणु युगान्ची,
स्मित नित्य बघुनी त्यान्चे
आनन्द मनी उभवती….
किरणे अशी रवीची
उल्हास नित्य देती,
जावे तिथे रहाया
स्पृहा असे मनासी……
तो उंच वृक्ष तिथे
ठाके रक्षिण्याला,
निश्चल जरी असे तो
मोहात गुन्तविणारा……..
जरी मेघ बरसती ते
स्वर्गीय रूप कैसे,
हरवून त्या रुपाला
वनस्थ कां न व्हावे…….
कुसुमे मनामनाला
रिझवीत नित्य असती,
वार्यातुनी गीताची
मोहित शिळ येई……..
मनी वाटते मला ते
येई मुकुन्द तेथे,
तो वाजवीळ पावा,
हरण्यास दु:ख सारे……..
स्वर्गातुनी पाहती
ते देव अंतरिक्षी,
करण्यास नृत्य तेथे
त्या अप्सरा उतरती………
गातील सामगान
गंधर्व ते नभीचे,
नृत्यात हरवूनी
मग नृत्य अप्सरांचे…………
वाटेल इंद्रदेवा
अवनीवरीच यावे,
त्या मेनकेचे
वनी नृत्य ते पहावे……..
ते रंग अमृताचे
बरसून गीत झाले,
एका क्षणात तेथे
दिव्यत्व ते प्रगटले…………
वेणुत दंग झाला
राधेत तो मिळाला,
त्या जान्हवीस मिळण्या
रत्नाकरास जैसा…………
© मुकुंद भालेराव
पोन्डा – गोमंतक
दिनांक: ७ जानेवारी २०२४
समय: संध्याकाळी: ७:४०