किती मुक्त झाले किती रिक्त झाले, किती भावनांचे आवेग आले,
मनाच्या किनारी किती भारलेले, स्वप्नात दिसले किती सत्त्य झाले……
रमता किती भूतकाळीच तेव्हा, चटके किती ते, मनी साहलेले,
हर्षात बरसेल उषा उद्याची, मनी भावलेले गीतचित्र झाले……
आता स्वप्न ऐसे मनी व्यापलेले, वृथा ते नसे ही मनी साठलेले,
कुणी ते मनाला कसे स्पर्श केले, स्वरांच्या रूपांचे असे मेघ आले……
किती अक्षरांचे असे मेघ झाले, उमलत्या नभाचे, असे गीत झाले,
दिशा कशाला रस्ते कशाला, प्रवासास आता जाणे कशाला……
रसाचे मनी हे रसपान झाले, स्वर्गीय सारे रममाण झाले,
किती पाहिल्या अप्सरा नाचताना, माधुर्य अद्वैत ललनाच सार्या ……..
असे संगीताचे रसपान जलसे, जणू उत्सवाचे ऋतु भारलेले,
दिव्यांच्या अशा ह्या अगणित राशि, दैदीप्य सारे मना भाळलेले……
हरी तेथ होता मनी मुक्त लहरी, माझेच रूप ते-तो-मी-हरी ही,
नव्हता दुजाचा खोटा पसारा, कुणी भक्त नव्हता कुणी शाम दुसरा………..
मेघात त्याचे हरिरूप तेव्हा, पाहुनी मी हरलोच तेव्हा,
इतक्यात राधा सन्ंनीध तेथे, हरीचेच दुसरे, जणू रूप तेथे………
पाहिले हरीला माझ्यात आता, कुठे द्वैत आता माझ्यात आता,
नसे वेगळा तो राधा सखा तो, मनी भाव जैसा माझा सखा तो………
नको स्तोत्र आता सुक्ते कशाला, मनाचा पसारा आता कशाला,
नको तार्कीकांचे तसे रिक्त व्यर्थ, अन शाब्दिकांचे वाक्ये निरर्थ………..
मनी शांत वाटे नसे प्रश्न काही, मनी शांत आता हरीचेच रूप,
मनी अमृतचा वर्षाव झाला, हरिरुप सारा आता देह झाला……..
मुकुंद भालेराव
| औरंगाबाद | १५-०६-२०२१ |
Back To Top