Marathi

एकरूप तुझ्यात होऊ दे………..

पावसाच्या जलधारांवर
एक घरकुल बांधून घेतो
अधांतरी स्वप्नासारखे
कल्पनेतील घरकुल बांधून घेतो…….

घर माझे ते अदृश असेल
पाया नसेल घराला
त्या घराला दारे नसतील
खिडक्या सुद्धा नसतील त्याला……..

छत असेल काचेचे
पाया असेल वाऱ्याचा
सगळीकडून कांच असेल
जणू सहवास अरण्याचा…….

सगळीकडे लख्ख प्रकाश असेल
तेजोवलय सभोवती असेल
आत-बाहेर प्रकाशाचे
सगळीकडे साम्राज्य असेल………

हवेच्या मुक्त प्रवाहावर
शांतपणे बसता येईल
गप्पादेखील सखीबरोबर
मनसोक्त मारता येतील……….

दिवस वा रात्र असेल
काय फरक पडेल त्याने
दिवसा सूर्यप्रकाश असेल
रात्रीला चांदण्यांचा सहवास असेल…….

रानामधील असंख्य पशुपक्षी
मैत्री येतील करायला
जंगला मधील श्वापदे मात्र
घाबरवत असतील राहण्याला………..

घर उंच वरती असेल
हवेवर तरंगत असेल,
खालून प्राणी जात असतील
भक्ष त्यांचे शोधात असतील………..

विजेचे दिवे नसतील
कुलूप नसेल घराला,
कारण दारेच नसतील
तर कडीकोंडा कशाला………

वारा गाणे गात असेल
वृक्षांचा ताल असेल
उस्फुर्त ओमकाराचा
अनाहत ध्वनी असेल…..

इतके छान सुंदर असेल
पवित्र शुद्ध स्थान असेल,
योग तेथे करता करता
समाधीचे कारण असेल…….

क्षणात एका शांत होईल
भरकटणारे मन माझे,
गात्रे सारी शिथिल होतील
चित्ताच्या साथीला……….

अविरत वर्षा होईल अशी
गात्र गात्र शांत होतील,
शतजन्माचे पुण्य क्षणात
अंतरात उमलून येईल………

आतून येईल एक आवाज
कधीच नसेल ऐकलेला
तरीही वाटेल गाढ मैत्रीचा
जन्मोजन्मीच्या ओळखीचा……..

तोच असेल तो आत्माराम
समाधीत ज्याचा शोध असेल,
ज्याच्यासाठी ऋषीमुनींचे
तप अनुष्ठान होत असेल………

निर्णयाचा तोच क्षण
ठरवेल सारे भाग्य माझे,
‘श्रेयस’ समोर दिसता क्षणी
‘प्रेयस’ सारे गळून पडेल…………

अनुभूती येईल मला
कठोपनिषदाची,
शरीराच्या रथामध्ये
आत्म्याच्या सारथ्याची………..

इंद्रियांचे वारू माझे
नाही स्वैरभैर उधळणार,
मनाचा लगाम माझा
निश्चयाने नियंत्रण करणार………

मनात अनंत भावनांचे
तरंग उठतील ऊर्ध्वगामी
मन:सुक्त उत्पन्न होईल
ईश प्रार्थना करण्याशी …………

स्तवन असेल आत्म्याचे
सखा होऊ दे केशवा,
चाल माझ्या सांगाती
अर्जुन सुदामा सारखा………

प्रार्थना एकच केशवा तुला
योग्य वेळी बुद्धी दे
देवा माझा हात धरून
अर्जुनासारखे करून घे………

विश्वरूप दर्शन नको मला
हात तुझा पाठीवर राहू दे,
एकच आहे मनीषा माझी
एकरूप तुझ्यात होऊ दे………..


© मुकुंद भालेराव
छत्रपती संभाजी नगर
दिनांक: २३-०७-२०२३ / रात्रो: २३:५१
दिनांक: २४-०७-२०२३ / सकाळी: ०९:५०

Share this on:
©2020: Mukund Bhalerao | Web Master: TechKBC
Back To Top